Breaking News

अपघातांना आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई नव्हे तर प्रबोधन हाच उपाय ः फुलारी


सांगली, 12 - वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई नव्हे तर लोकसहभागातून प्रबोधन हाच उपाय आहे. लोकसहभागातून शिक्षण आणि रस्ते सुरक्षेचे प्रबोधनात्मक संदेश देणारे फलक जागोजागी लावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी आज येथे केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 27 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2016 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय (काका) पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (गृह) रावसाहेब देसाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, पोलीस निरीक्षक (वाहतूक नियंत्रण शाखा) दादासाहेब चुडाप्पा, आर. एस. पी. चे महासमादेशक अरविंद देशमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी म्हणाले, देशात दरवर्षी सव्वा लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यातील 15 हजार एवढे लोक महाराष्ट्रातील असून, सांगली जिल्ह्यातील 200 लोकांचा मृत्यु रस्ते अपघातात होतो. वाहनांच्या वाढत्या संख्येंप्रमाणे रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढतेय. याला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई हा उपाय नव्हे कारण, 2014 च्या तुलनेत 2015 मध्ये कारवाईतून पाच पट दंड अधिक आकारण्यात आला आहे. 2015 मध्ये दंडात्मक कारवाईतून एक कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे. परंतु, कारवाई करूनही अपघातांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे त्यासाठी लोकसहभागातून प्रबोधन हाच उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे, गाणी ऐकणे अशा गोष्टींमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. रस्ता आपल्याच मालकीचा अशी बेफिकीर वृत्ती असून, परदेशाच्या तुलनेत भारतात रस्ते वाहतुकीत बेशिस्त आहे. सेल्फी, पार्किंग, वाहन परवाना यामधील बेशिस्तीवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्यावर चिंतन करून आज शालेय स्तरावर बालकांना सुरक्षित वाहतूक व रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले तरच भविष्यातील तरूण पिढी वाचेल. सांगली आपली चांगली या ब्रँडप्रमाणे वाहतूक सुरक्षेची दिशा सांगलीकडून राज्याला मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार संजय (काका) पाटील म्हणाले, अपघात होतात म्हणून कोणी वाहने चालवण्याचे थांबत नाही. मात्र, इतर गुन्ह्यांच्या तुलनेत रस्ते अपघातातील बळींची संख्या जास्त आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी कसे होईल, यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जनजागृती व दक्षता कशी घेता येईल, यासाठी गतीमान प्रकिङ्घया राबवावी, असे सांगून पाटील यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 
हे अभियान 15 दिवस न राहता, कायमस्वरूपी राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त करून आमदार सुधीर गाडगीळ यांनी नव्या पिढीचे वेगावर नियंत्रण नाही. त्यामुळे शालेय स्तरावर आठवड्यातून किमान एकदा वाहतूक सुरक्षेचे पाठ अनिवार्य करावेत, अशी सूचना केली.
रस्ते सुरक्षा अभियान उद्घाटन कार्यक्रमात महिलांची मोटर सायकल रॅली, आर. एस. पी. विद्यार्थ्यांची रॅली व मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलच्या वाहनांची रॅली काढण्यात आली. मान्यवरांनी या रॅलींना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर राजवाडा चौक येथून या रॅलींचा प्रारंभ होऊन जुन्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ सांगता झाली. 
प्रास्ताविकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले म्हणाले, रस्ते अपघातांच्या संख्येंत घट व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत असून ते 24 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. अभियानाचे यावर्षीचे घोषवाक्य रोड सेफ्टी - टाईम फॉर अ‍ॅक्शन आहे. त्याअंतर्गत तालुकास्तरावर विविध कार्यकङ्घमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून सुरक्षासंदेशाचा प्रसार, वाहनचालकांचे प्रबोधन, माहितीपत्रके, चित्रकला व निबंध स्पर्धा, वाहनांना परावर्तक चिकटवणे यासह 18 महाविद्यालयांमध्ये वर्षभर जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. 
यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक पत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच सांगली आपली चांगली या ब्रँडचे प्रातिनिधीक अनावरण करण्यात आले.रॅलीत जवळपास एक हजार विद्यार्थी व अन्य सहभागी झाले होते. सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक (वाहतूक नियंत्रण शाखा) बाळासाहेब माळी यांनी केले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक सचिन विधाते यांच्यासह पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, तसेच अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शालेय विद्यार्थी, मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलचे चालक, नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.