समीर गायकवाड याच्याविरूद्ध परिस्थितीजन्य पुरावे
पुणे (प्रतिनिधी)। 25 - काँमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्त्येप्रकरणी अटक केलेल्या सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्याविरूद्ध थेट नाही, पण परिस्थितीजन्य पुरावे असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याविरूद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राचा अभ्यास करून त्याला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती अॅड. हर्षद निंबाळकर यांनी दिली.
काँमे्रड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर 16 फेब्रुवारी 2015 रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन मारेकर्यांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. या खटल्यात विशेष सरकारी वकिल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कॉ. पानसरे दांमपत्यावर हल्ला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. हे दोघे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. समीर गायकवाडला या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याविरूद्ध 415 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून 77 साक्षीदारांचा त्यात समावेश आहे. हल्ला झाला त्या ठिकाणी समीर नव्हता असे दिसून येत आहे. त्याच्याविरूद्ध थेट पुरावा नसला तरी परिस्थितीजन्य पुरावे भरपूर आहेत. त्यांच्या घरातून 10 ते 12 मोबाईल जप्त केले. सनातन संस्थेचे साहित्य त्यांच्याकडे सापडले आहे. मोबाईल, एसएमएसचे संभाषण जप्त केले आहे. काँम्रेड पानसरे यांनी सनातन संस्थेविरूद्ध भाषण केली, लेख लिहिले. त्यामुळे त्यांना सनातन संस्थेचे लोक त्यांच्यावर चिडून होते. त्यांना धमक्या येत होत्या.
सनातन संस्थेने कॉ. पानसरेंविरूद्ध गोव्यात दिवाणी दावा दाखल केला होता. बार कौन्सिलकडेही त्यांनी तक्रार दिली होती. त्यामुळे गायकवाड यांच्याविरूद्ध परिस्थितीजन्य पुरावे असल्याचे आरोपपत्रातून दिसून येत आहे. रूद्र पाटीलशी समीर गायकवाडचे घनिष्ट संबंध असल्याचे दिसून येत आहे, असे अॅड. निंबाळकर यांनी सांगितले. समीर गायकवाडने जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. त्यावेळी आपण जामीन अर्जाला जास्तीत जास्त विरोध करणार आहोत, असे ते म्हणाले. स्वत: मुख्यमंत्र्याचे या खटल्यात लक्ष आहे हा खटला अन्यत्र वर्ग करावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मात्र, हा खटला अन्यत्र हलविण्याबाबत
कोणतेही ठोस कारण दिसून येत नाही. राज्य सरकारतर्फे हा खटला हलविला जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री स्वत: या खटल्यात लक्ष घालत आहेत, असेही अॅड. निंबाळकर म्हणाले.