महावितरणच्या जनमित्रास थकबाकीदारा कडून मारहाण
पुणे (प्रतिनिधी), 25 - थकीत असलेल्या वीजदेयकामुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या जनमित्रास थकबाकीदार व त्याच्या साथीदाराने जबर मारहाण केल्याची घटना बोपोडी येथील डबरचाळ येथे घडली. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शिवाजीनगर विभाग अंतर्गत खडकी शाखा कार्यालयातील महेश राठोड, पद्माकर म्हात्रे व वैभव गोसावी हे जनमित्र थकबाकीदार वीजग्राहकांची यादी घेऊन वीजपुरवठा खंडित करण्यासाठी शुक्रवारी (दि. 22) बोपोडीच्या डबरचाळ परिसरात गेले होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास आरोपी प्रवीण भगवान पवार याच्या घराचे वीजदेयक थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्याचवेळी मित्रासह तेथे आलेल्या प्रवीण पवार याने वीजपुरवठा का खंडित केला अशी विचारणा केली. महेश राठोड यांनी थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे सांगितले. त्यानंतर प्रवीण पवार व त्याच्या साथीदाराने महेश राठोड यास शिविगाळ करून बेदम मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. तेथे उपस्थित असलेले जनमित्र पद्माकर म्हात्रे व वैभव गोसावी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिविगाळ करून मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी महेश राठोड यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी प्रवीण पवार व एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी प्रवीण पवार याला अटक केली आहे.