Breaking News

जनजागृतीसाठी हेल्मेट रॅली


 नाशिक/प्रतिनिधी। 12 - नागरिकांमध्ये वाहतुकींच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू असतात, याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि.10) सनविवि फाउंडेशन यांच्यातर्फे महिलांसाठी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाहतूक नियमांची माहिती व्हावी तसेच अपघाताच्या दृष्टीने हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने भोसला मिलिटरी महाविद्यालय ते महात्मानगर मार्गावर हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या हेल्मेट रॅलीमध्ये महिला आणि तरुणींचा मोठया प्रमाणावर सहभाग पहायला मिळाला. तसेच वाहतूक शाखा, आरटीओच्या महिला अधिकारी आणि महिला कर्मचार्यांनीदेखील या रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.  रॅलीद्वारे दुचाकीस्वारांनीदेखील हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याचा संदेश महिलांनी दिला. महात्मानगर 
क्रिकेट ग्राउंड येथे मिसेस इंटरनॅशनल नमिता कोहोक यांच्या उपस्थितीत या रॅलीचा समारोप करण्यात आला.  यावेळी सनविवि फाउंडेशनतर्फे सोनल नेरे, सोनल मांडगे, आदिती आंबेकर, काजल विसपुते, इशा पाटील, अमी छेडा, मानसी तावरे आदि उपस्थित होते.