Breaking News

ठोकमंथन :: हिंदू बहुजन जागो हो

मराठा सेवा संघासाठी सोळावं वरीस धोक्याचं.... की मोक्याचं?

                    सोळावं वरीस धोक्याचं... असं एक गीत चांगलच परिचित आहे. मराठी मनावर या गीताची एक वेगळीच जादू आहे. अनेक नवी आव्हाने आणि या नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद देणारे नवनवीन साधने निर्माण करणारे एकविसावे शतकही आता सोळाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. आणि म्हणूनच एकविसाव्या शतकाचं हे ‘सोळावं वरीस’ धोक्याचं की मोक्याचं... याचा निर्णय मराठा सेवा संघाला घ्यायचा आहे. गेल्या 15 वर्षांत बहुजन मराठा समाजाने अनेक स्थित्यंतर अनुभवली. अनेक चांगले अन तितकेच कटू अनुभव घेतले अन पचविले देखिल. या स्थित्यंतरांमध्ये मराठा सेवा संघाचे पर्यायाने शिवतत्वोपासक पुरूषोत्तम खेडेकर यांची अहंम भुमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्व समाजसमावेशक तत्वे महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार आणि छत्रपती शाहू महाराज यांची दीनदलितांविषयीची कळकळ यांचा सुरेख संगम साधत पुरूषोत्तम खेडेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघटीत होऊन संघर्ष करा, अन्यायाविरूध्द हक्काचे समर्थन करा या भुमिकेचा सातत्याने अंमल केला, त्याचीच परिणीती केवळ मराठाच नव्हे तर अवघा बहुजन एकवटण्यात झाली. गंतव्य काळाचे हे फलद्रुपीकरण असले तरी बहुजन समाजासमोरील आव्हानं अजूनही संपलेली नाहीत. किंबहुना नजिकच्या भविष्यात हीच आव्हानं नवे रूप धारण करून अधिक उग्र स्वरूपात आक्रमकपणे समोर येण्याचीच चिन्हे आहेत.
              या अर्थाने हे सोळावं वरीस धोक्याचं आहे असे मानले तरी हाच धोका मोका म्हणून वापरण्याची संधी समोर दिसत आहे. वर उल्लेख केलेले सर्वच महापुरूष बहुजन समाजासाठी पुज्यनिय आहेत. त्यांच्याच आदर्श विचारांना बहुजनांनी जीवन मानले आहे. पुरूषोत्तम खेडेकर यांचे नेतृत्वही याच महापुरूषांच्या विचारांना समर्पित असल्याने अवघा बहुजन त्यांच्याकडे नजर लावून बसला आहे आणि म्हणूनच बहुजनांची अपेक्षापुर्तीच मोठे ओझे खेडेकरांच्या नेतृत्वाच्या खांद्यावर आहे. त्यातूनच त्यांची जबाबदारीही वाढली आहे ही जबाबदारी पेलतांना खेडेकरांना अधिकच सजगता दाखविण्याची गरज पुढील काळात भासणार आहे. बहुजनांच्या गरजा काय आहेत. हे आम्ही खेडेकरांना नव्याने सांगण्याची गरज नाही. या गरजा आणि पुरूषोत्तम खेडेकर हेच एक समीकरण या चळवळीचा गाभा बनला आहे. अगदीच नव्या मुद्द्यावर बोलायचे झाले तर सिंदखेडराजा परिसरात शिवधर्म पिठासाठी जागा ही जुनीच मागणी आहेत. आरक्षणाच्या मागणीप्रमाणेच वेळोवेळच्या सत्ताधार्‍यांनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहे. आरक्षणाचे मुसळ केरात घालणार्‍या सत्ताधार्‍यांनी अगदी कालपरवाच जिजाऊ विद्यापीठ आणि बळीराजा संशोधन केंद्र देण्याची घोषणा केली आहे. घोषणा करणे हाच तर राजकारण्यांचा धर्मपडि आहे. घोषणांच्या प्राणवायूवरच त्यांच्या राजकारणाचा जीव तग धरून असतो. घोषणा, आश्‍वासने आहेत तोपर्यंत त्यांचे राजकीय आयुष्य सुरळीत असते. म्हणूनच घोषणा किंवा आश्‍वासनांची पुर्तता करण्याचा कालावधी अमर्याद ठेवण्यावरच कुठल्याही सत्ताधार्‍यांचा कल राहिलेला दिसतो. म्हणूनच आश्‍वासने पदरात पाडून घेण्याची ताकद असलेला वर्गच न्यायहक्क मिळवू शकतो ही इतिहासाची शिकवण विसरता येणार नाही. मराठवाडा नामांतर मुद्द्याचे उदाहरण याठिकाणी मुद्दामहून विचारात घ्यावे लागणार आहे. प्रामाणिक संघर्षाला येणारे यश कुठलेही राजकारण अडवू शकत नाही हे नामांतर चळवळीने दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरेपासून शरद पवारांपर्यंत, आठवले-कवाडे पासून बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत अवघ्या नेत्यांनी केलेले तत्कालिन राजकारणही नामांतराच्या लढ्याचे बळ कमी करू शकले नाही. ही बाब मराठा सेवा संघाच्या लढ्यानेही लक्षात घेऊन पुढील वाटचाल ठरवावी. आव्हाने पुष्कळ आहेत. पण आव्हानांना सामोरे जाण्याचे बळही बहुजन चळवळीत आहे हे सारे बळ पुरूषोत्तम खेडेकरांच्या पाठीशी उभे राहू शकते. मात्र त्यासाठी धोक्याचे मोक्यात परिवर्तन करण्याचा सकारात्मक विचार अंमलात आणला जायला हवा. आणि त्याची सुरूवात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होऊ घातलेल्या 12 जानेवारीच्या सोहळ्यात निक्षूण व्हायला हवी. यावेळी पुरूषोत्तम खेडेकरांनी आपला पुर्वीचाच शिवतत्वी बाणा दाखविला तर धोक्याचे असलं तरी हे 16 व वरीस नक्कीच मराठा सेवा संघासाठी मोक्याचं ठरेल आणि ते ठरावं यासाठीच इंग्रजी नववर्षाच्या प्रथम दिनी हार्दिक सक्रिय शुभेच्छा.