Breaking News

संपादकीय :: सांस्कृतिक दोलायमान...



                        नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपण सारे सज्ज झालो असतांना हे स्वागत का आणि कशासाठी करावे? असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला नेहमीच पडत असतो. साधारणपणे वर्षातील 365 दिवस संपुन गेल्यानंतर उगवणारा नवा दिवस आपण नव वर्ष म्हणून मानतो. नवे वर्ष जानेवारीपासुनच सुरु होण्याचा वारसा इंग्रजांपासुन आपणांस मिळाला आहे. अर्थात हे वर्ष मानण्याची पध्दत सार्‍या जगाने स्विकारली आहे. त्यामुळे काही धार्मिक संघटना नव्या वर्षाचे स्वागत करुन नये यापासुन तर ही आपली संस्कृती नाही इथपर्यंत वितंडवाद करीत असतात. परंतु जगातील सर्वसमुदाय आधुनिक आणि  विज्ञानवादी करण्याचे श्रेय इंग्रजांना जेवढे द्यावे लागेल तेवढे जगातील इतर कोणत्याही समुदायाला देता येणार नाही. जगाची प्रमाणवेळ असेल दिवस असेल महिना किंवा वर्ष अशी कोणतीही कालगणना इंग्रजांनी दिलेल्या तारिख, वर्ष आणि महिन्यानुसारच केली जात असल्यामुळे जगात व्यवहार्य एक संघता निर्माण झाली आहे. त्यामुळे इंग्रजांच्या या संस्कृतीला ही आमची संस्कृती नाही असे जगातील कोणताही समुदाय म्हणून शकत नाही. तरीही इतरांनी सांगितले म्हणून आपण अंमलात आणावे अशी काही सक्ती जगात केली जावू शकत नाही. परंतु विज्ञानाच्या कसोटीवर जर आपण ही कालगणना तपासुन पाहिली तर इंग्रजांनी दिलेली ही गणना विज्ञानावर आधारलेली आहे. या विज्ञानाचा आधार खगोल शास्त्रातील घडामोडींवरुन ठरतो. म्हणजे सुर्य हा पृथ्वीभोवती फिरतो असा जो पूर्वी समज होता तो विज्ञानाने मोडून काढला. तर पृथ्वी हिच सुर्याभोवती फिरते आणि त्या एकमेकांच्या
भोवती फिरण्याचा जो काळ आहे तो दिवस, महिने आणि वर्ष यांच्या विभागला जातो. सुर्य, चंद्र आणि पृथ्वी या ग्रहांच्या परिभ्रमण आणि परिवलन या गतींवरुन दिवस, रात्र, तारिख आणि महिना हे ठरतात. जसे चंद्राच्या गतीवरुन महिना ठरतो म्हणजे चंद्राला स्वत: भोवती आणि पृथ्वी भोवती फीरण्यास
जो समान कालावधी लागतो तो जवळपास साडेएकोणतीस दिवसांचा असतो. त्यामुळे महिन्याचा कालावधी तीस दिवसांचा ठरविला जातो. अर्थात हे केवळ आपण उदाहरणादाखल सांगितले आहे. ते यासाठी की इंग्रजांनी दिलेली कालगणना ही पूर्णपणे विज्ञानावर आधारलेली आहे. त्यामुळे आधुनिक जगाला हि कालगणना नाकारता येणार नाही. धर्म, संप्रदाय यांच्यावर विज्ञानाचा नव्हे तर परंपरेचा पगडा असतो आणि ती मोडून काढण्यासाठी त्यांची मानसिक तयारी नसते. त्यामुळे या नववर्षाला मानण्याची किंवा साजरी करण्याची मानसिकता नकारात्मक ठेवली जाते. या सर्वांचा सारासार विचार करुन आपल्याला असे म्हणता येईल की नववर्ष आणि जाणारे वर्ष ही कालगणना ग्रहांच्या खगोलिय घडामोडींवर आधारलेल्या असल्या तरी सर्व सामान्य माणसासाठी येणारा दिवस आणि गेलेला दिवस यामध्ये काहीही फरक त्याला पडत नाही. त्याच्या तळहातांवर पोसले जाणारे त्याचे पोट श्रमल्याशिवाय भरणार नाही याची त्याला जाणीव असते. त्यामुळे नव वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी त्याची आर्थिक क्षमता नसते. त्याचप्रमाणे येणार्‍या दिवसालाही त्याला नव्या संकटाला किंवा श्रमाला स्वत:ला झोकून द्यावे लागते. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत किंवा पहाटेपर्यंत हॉटेल चालु असणे, बसेस, रेल्वे उशीरापर्यंत सोडणे याचा त्याच्या जीवनाशी काहीही संबंध नसतो. सरत्यावर्षाचा 31 डिसेंबर असो अथवा नव्या वर्षाचा 1 जानेवारी असो या दोघांतील फरक त्याला भौतिकदृष्ट्या काहीही जाणवत नाही. शिवाय या देशाच्या सत्ताधार्‍यांनी त्याच्या या भौतिकतेला बदलविण्याची भूमिका कधीही घेतली नाही. त्यामुळे तो आहे त्या स्थितीतून वर येत नाही. परिणामी ज्या पंथ, धर्म आणि वेगवेगळ्या पारंपारिक प्रवाहांकडून या नव वर्षाची संस्कृती आपली नाही असे म्हणण्याचा जो प्रघात आहे त्याला या सामान्य माणसाकडून समर्थन मिळू लागते. कारण त्याला त्या बदलाचा कोणताही आनंद साजरा करता येत नाही किंवा येणारा नवा दिवस त्याच्या जीवनात बदलही घेवून येत नाही.