Breaking News

निळा, भगवा अन पुन्हा निळा !

‘रामजी’ नंतर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे राजकारण 

बदायू , दि. 11, एप्रिल - निळा, भगवा अन पुन्हा निळा हा प्रवास आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तर प्रदेशातील बदायू येथील पुतळ्याचा. विटंबनेच्या घटनेनंतर डॉ. आंबेडकरांचा भगव्या रंगातील पुतळा देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. याच पुतळ्याला बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निळा रंग दिला आहे. उत्तर प्रदेश राज्यातील बदायू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली होती. त्यानंतर त्याच जागेवर नव्याने पुतळा उभारण्यात आला. मात्र, अनावरणावेळी पुतळ्याचा रंग भगवा असल्याने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. स्थानिक बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांनी त्याला आक्षेप घेतला होता. डॉ. आंबेडकरांच्या नावात ’रामजी’ शब्दाच्या उल्लेखानंतर पुतळ्याचा रंग भगवा करून राजकारण सुरू असल्याची टीका नेत्यांनी केली होती. दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे स्थानिक नेते हिमेंद्र गौतम यांनी पुतळ्याला निळा रंग दिला. त्यामुळे पुन्हा एकदा महापुरूषांवरून रंगाचे राजकारण उफाळून येण्याची शक्यता आहे.