Breaking News

वर्षात फडणवीस सरकारचे 286 निर्णय

मुंबई, प्रतिनिधी, दि. 19 - मंत्रिमंडळातल्या निर्णयांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप हे पूर्णत: असत्य असून, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयच झाला नाही, असे एकही खाते नाही. असा खुलास करत फक्त एका वर्षात फडणवीस सरकारने 286 निर्णय घेतल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. 
गेल्या 6 वर्षांतील आकडेवारी पाहता सर्वाधिक निर्णय या एका वर्षाच्या कालखंडात घेतल्याची माहिती सरकारने दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 14 विभागाने एकही निर्णय घेतला नसल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने म्हटले की, आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर 2009 मध्ये 19 निर्णय घेतले होते. 2010 मध्ये 155 निर्णय, 2011 मध्ये 168 निर्णय, 2012 मध्ये 162 निर्णय, 2013 मध्ये 198 निर्णय घेण्यात आले. 2014 मध्ये निवडणुका होणार असल्याने अवघ्या 9 महिन्यांत 260 निर्णय घेण्यात आले. त्या तुलनेत फडणवीस सरकारने पहिल्याच वर्षी 286 निर्णय घेतले आहेत.  आघाडी सरकारने पाच वर्षांत एकूण 962 निर्णय घेतले होते, तर या एक वर्षात फडणवीस सरकारने 286 निर्णय घेतल्याने आधीच्या आकडेवारीशी तुलना करता 30 टक्के निर्णय पहिल्याच वर्षी घेतले आहेत. बंदरे, माहिती व जनसंपर्क, माजी सैनिकांचे कल्याण, राजशिष्टाचार अशा खात्यांमध्ये निर्णय  झालेला नाही, हा आरोप स्पष्टपणे चुकीचा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.  यापूर्वीच्या सरकारने पाच वर्षांत आघाडी सरकारने बंदरे-1, पर्यटन-1, सांस्कृतिक कार्य-3, माहिती व जनसंपर्क-1, माजी सैनिक कल्याण-1, राजशिष्टाचार-1, सार्वजनिक बांधकाम विभाग-4, अल्पसंख्यक विभाग-4, गृहनिर्माण विभाग-4, माहिती व तंत्रज्ञान-1 असे निर्णय घेतले. 
आघाडी सरकारने मागील पाच वर्षात रोजगार व स्वयंरोजगार (1), पाणीपुरवठा व स्वच्छता (5), क्रीडा (3), मराठी भाषा (1), पर्यावरण (1) इतके अत्यल्प निर्णय घेतले. नबाब मलिक राज्य मंत्रिमंडळात होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या पूर्ण कारकिर्दीत त्यांनी केवळ 7 निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.