ऑस्ट्रेलियाचा भारतावर 25 धावांनी विजय
कॅनबेरा,20 - ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारतावर 25 धावांनी मात करून, पाच सामन्यांच्या मालिकेत आपली आघाडी 4-0 अशी वाढवली. शिखर धवन आणि विराट कोहली या शतकवीरांनी दुसर्या विकेटसाठी रचलेल्या 212 धावांच्या भागिदारीने भारतीय विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पण धवन, धोनी आणि कोहली या तिघांना 11 चेंडूंत माघारी धाडून ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे सनसनाटी विजयाचे स्वप्न उधळून लावले. ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव 49.2 षटकात 323 धावांत गुंडाळला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 349 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा 41 धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या कोहलीने धवनच्या साथीने फटकेबाजी केली. सलामीवीर शिखर धवनने 92 चेंडूत कारकिर्दीतील नववे शतक झळकावले. तर कोहलीनेही 84 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने शतक पूर्ण केले. कोहलीचे कारकिर्दीतील हे 25वे शतक आहे.
