Breaking News

चौकशीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पुणे, 20 - बनावट फेसबुक खाते काढून ओळखीच्या तरूणीशी चॅटिंग केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलेल्या एका तरुणाने पुणे पोलिस आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावरून 12 जानेवारी रोजी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रुबी रुग्णालयात उपचार घेत असताना या तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. सुजित अजित प्रधान (वय 19, रा. मोरवाडी, पिंपरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सुजित हा पिंपरीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. फेसबुकवर
मुलीच्या नावाने एक बनावट खाते तयार करून त्याच्याच महाविद्यालयातील तरुणीस त्रास देत असल्याची त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने सुजितला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार 12 जानेवारी रोजी सुजित आपल्या मोठ्या भावासह पुणे पोलीस आयुक्तालयातील सायबर गुन्हे शाखेच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयात आला होता. त्याच्या भावाला तिथे गेल्यावर सुजितविरोधातील तक्रारीची माहिती कळली. त्यामुळे भावाने सुजितची चांगलीच कानउघडणी केली होती. या तक्रारीच्या पोलिसांच्या चौकशीच्या तणावातून सुजितने थेट चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.