Breaking News

नवी मुंबई विमानतळावरून 2019 मध्ये पहिले टेक ऑफ

मुंबई, प्रतिनिधी, 29 -  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यातील परवानग्यांचे सर्व अडथळे दूर झाल्याने टेक ऑफचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानतळाच्या विकासपूर्व (प्री डेव्हलपमेंट) कामांचे भूमिपूजन करून एप्रिलमध्ये कामास सुरवात होईल. जुलै महिन्यात स्ट्रॅटेजिक पार्टनर नियुक्त होईल आणि 2019 मध्ये पहिले उड्डाण होईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिली. मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबईत एक हजार 160 हेक्टर क्षेत्रावर नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे प्रस्तावित आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेबरोबर नागरी उड्डाण मंत्रालय, संरक्षण विभाग, वन व वन्यजीवन विभाग, पर्यावरण, सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. या प्रकल्पात पूर्णपणे स्थलांतरित होणार्‍या सात गावांच्या पुष्पक नगर येथील पुनर्वसनाच्या कामाला गती मिळाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिवरांच्या संरक्षणाबाबत उपाययोजना केल्याने विमानतळाच्या उभारणीतील अडथळा दूर झाला आहे.