Breaking News

सेवा हमी’तील 156 सेवा ऑनलाइन

मुंबई, प्रतिनिधी, 29 - सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सचिवालय व माहिती तंत्रज्ञान संचालनालयातर्फे आपले सरकार वेबपोर्टलवरील तक्रारींसाठी सर्व जिल्ह्यांचा समावेश, सेवा हमी कायद्यातील 109 सेवांचे ऑनलाइन लोकार्पण, तसेच महाराष्ट्र-ाूर्सेीं या सेवांचा लोकार्पण सोहळा प्रजासत्ताकदिनी झाला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव पी. एस. मीना, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम उपस्थित होते. 
फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लोकाभिमुख प्रशासनाचे स्वप्न पाहिले होते. वर्षभरात आपले सरकार वेबपोर्टलमध्ये संपूर्ण राज्याचा समावेश, सेवा हमी कायद्यातील 150 सेवा ऑनलाइन केल्यामुळे राज्याच्या प्रशासनाने नवीन उंची गाठली आहे. गेल्यावर्षी शुभारंभ केलेल्या आपले सरकार वेबपोर्टलने मंत्रालय स्तरावरील तक्रारींसाठी व्यासपीठ निर्माण केले आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी 6 विभागांचा या वेबपोर्टलमध्ये समावेश करण्यात आला. आजपासून सर्व जिल्ह्यातील तक्रारी या वेबपोर्टलवर मांडता येतील. या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. वेबपोर्टलवरून तक्रार निवारणाचा दर हा 89 टक्के आहे, तो आता अधिकाधिक सुधारला पाहिजे. ऑनलाइन सेवांचे पुढचे पाऊल म्हणून आजपासून या कायद्यातील अजून 109 सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. 
आपले सरकारची कार्यप्रणाली 
नागरिकांना ऑनलाइन आणि सुलभतेने तक्रारी सादर करता याव्यात, यासाठी शासनातर्फे गेल्या प्रजासत्ताकदिनी आपले सरकार हे पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात विविध प्रकारच्या प्रशासकीय सेवा आता उपलब्ध होतील. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कामकाज पेपरलेस व डिजिटल होण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. यासुविधेमुळे नागरिकांना संबंधित विभागाकडे तक्रारी करणे सुलभ होणार असून, तक्रार दाखल करण्याविषयी माहिती, त्यावरील कार्यवाही, लागणारा कालावधी आदी माहितीही त्याला याच पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे. या यंत्रणेत नागरिकांकडून दाखल झालेल्या तक्रारींच्या कार्यवाहीचा पाठपुरावा मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे.