दिल्लीतील सम-विषम’चा प्रयोग 15 जानेवारीपर्यंतच- वाहतूक मंत्री
नवी दिल्ली, 9 - प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेली सम-विषम योजना 15 जानेवारीपर्यंतच राबविण्यात येणार असल्याची माहिती दिल्लीचे वाहतूक मंत्री गोपाल राय यांनी दिली आहे.
दिल्लीत चारचाकी वाहने सम-विषम क्रमांकानुसार रस्त्यावर उतरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. 1 जानेवारी रोजी प्रायोगिक तत्त्वावर सुरु झालेल्या या योजनेच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राय यांनी या योजनेला 15 जानेवारीनंतर मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. दिल्ली सरकारकडून ही योजना बेकायदेशीररित्या राबविण्यात येत असल्याची माहिती पसरविण्यात येत असल्याचे म्हणत वाहन कायद्यातील कलम 115 अन्वये ही योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकार संपूर्ण 15 दिवस प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविणार आहे.