नरेंद्र मोदी यांची हवाई दलाच्या या तळाला भेट --- पंतप्रधानांच्या भेटीसाठी या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था
पठाणकोट, 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. गेल्या आठवड्यामध्ये या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात सहा दहशतवादी ठार, तर सात जवान हुतात्मा झाले.
पंतप्रधानांच्या भेटीसाठी या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. या भेटीदरम्यान
पंतप्रधान मोदी यांनी हवाई दल, लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा
केली. या भेटीदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल हेदेखील उपस्थित होते. हवाई दलाच्या या तळावर पंतप्रधान मोदी जवळपास 90 मिनिटे होते. या दरम्यान त्यांनी तळावरील प्रत्यक्ष चकमक झालेल्या जागीही भेट दिली. गेल्या शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल तीन दिवस लष्करी कारवाई सुरू होती. त्यानंतर लष्कराने शोधमोहिमही राबविली. या शोधमोहिमेनंतर हवाई दलाचा हा तळ पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले होते.