मुंबईत आज जम्बो मेगाब्लॉक, 136 वर्षे जुन्या हँकॉक ब्रीज पाडकाम सुरु
मुंबई, 10 - मुंबई लोकलच्या सेंट्रल लाईनवर जम्बो मेगाब्लॉक सुरु झाला आहे. 136 वर्षे जुन्या हँकॉक ब्रीजला पाडण्याचं काम रात्रीपासून सुरू झाले आहे. रात्री साडेबारा वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
अंदाजे 500 ते 600 कर्मचार्यांच्या मदतीने हा पूल पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे अधिकार्यांनी व्यक्त केला. दरम्यान या
कामामुळे तब्बल 18 तासांचा मध्यरेल्वेवर जम्बो ब्लॉक ठेवण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे 100 लोकलसेवा आणि 42 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसंच काही गाड्या या फक्त ठाणे, कल्याण आणि दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तर लोकलसेवा फक्त
भायखळ्यापर्यंतच सुरु राहील. यावेळी बेस्ट आणि एसटीने प्रवाशांच्या सेवेसाठी अधिकच्या गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महत्वाचे काम नसल्यास, भायखाळा ते सीएसटी प्रवास करणे लोकांनी टाळावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.