Breaking News

कल्याण येथील अपघाताच्या पुनरावृत्तीची शक्यता?


कोपरगाव शहर प्रतिनिधी :
कल्याण येथे एका महिलेची दुचाकी रस्त्याच्या कपारीला अडकल्याने सदर महिला बसखाली जाऊन मरण पावली. शहरातील अहिंसा स्तंभाजवळ मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याला एक फूट उंचीची कपार तयार झालेली आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात होऊन कल्याणच्या अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नुकतेच काही रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम झाले आहे. परंतु काही ठिकाणी डांबरीकरण झालेले रस्ते अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहेत. असाच प्रकार शहरातल्या नावाजलेल्या चौकात घडलेला आहे. शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या अहिंसा स्तंभाजवळ धान्यबाजारजवळून मुख्य बाजारतळाकडे जाणाऱया रस्त्याचे नुकतेच काही महिन्यापूर्वी डांबरीकरण झाले. परंतु रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदाराने या बाजारतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला अर्ध्या भागात उतार दिलेला आहे. अर्धा रस्ता तसाच अर्धवट सोडून दिलेला आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना येताना अचानक खड्ड्यांला सामोरे जावे लागते. वाहन उतरत असतांना चारचाकी वाहनांचे पुढील चाके रस्त्यावर येतात व मागील चाके उंच टेकडावर तशी अडकतात. दुचाकीवरून रस्त्यावर चढतांना वाहन अडकून त्यावर अपघात होत आहेत. नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. याठिकाणी अनेक महिला स्वतःच्या छोट्या दुचाकीवर चढण्याचा प्रयत्न करतात. परंतु दुचाकी वाहने अडकत आहेत. त्यामुळे याठिकाणी गंभीर अपघात होऊन जीवितहानीच्या घटनेचेची भिती व्यक्त केली जात आहे.