Breaking News

झेरॉक्सची दुकाने चोरट्याने फोडली


।संगमनेर/प्रतिनिधी।
शहरातील मोमीनपुरा भागात तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यासमोरील तीन झेरॉक्सची दुकाने चोरट्याने फोडल्याची घटना आज [दि. ९] रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला लगेचच ताब्यात घेत अटक केले.

यासंदर्भात शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इमाम जलालुद्दीन सय्यद (रा. मोमीनपुरा संगमनेर, हल्ली रा. पुणे) असे यातील आरोपीचे नाव आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास त्याने मोमीनपुरा भागातील पोलीस ठाण्यासमोरील प्रथमेश नावाचे झेरॉक्स दुकान फोडून दुकानातील प्रिंटर, लॅमिनेशन मशीन, प्रिंटरचे कार्टरेज व काही रोख रक्कम चोरली. त्याचबरोबर बाजूला असलेल्या विश्वास झेरॉक्स दुकानाचे शटर कुलूप तोडून दुकानातील लॅमिनेशन मशीन असा एकूण ३५ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल चोरला. यावेळी चोर शेजारी असलेले तिसरे दुकान सद्गुरू झेरॉक्सचे शटर कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत असताना परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणातील फिर्यादी प्रथमेश झेरॉक्सचे मालक शरद गाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी इमाम जलालुद्दीन सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केले असता दि. १२ जुलैपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हेकॉ. खंडीजोड हे करीत आहेत.