शिर्डी लोकसभेची जागा रिपाईंला सोडा; आठवलेंना भेटणार शिष्टमंडळ
राहुरी तालुका प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेना-रिपाई युतीची जागा रिपाईंसाठीच सोडावी, अशी मागणी जिल्हा आरपीआयच्या पदाधिकार्यांमधून केली जात आहे. यासाठी लवकरच जिल्ह्यातील पदाधिकार्यांचे शिष्टमंडळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालणार आहे.
आगामी काळात देशभरात लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध प्रकारच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप, सेना रिपाईं एकत्रित येऊन निवडणूका लढविणार आहे. शिर्डी लोकसभेची जागा ही आरपीआय आठवले गटाला मिळावी, अशी मागणी पदाधिकारी वर्गातून होत आहे. या मतदारसंघात जवळपास २ लाख दलित मतदार आहेत. ते आरपीआय सोबत राहणार आहेत, यात शंका नाही. शिर्डी मतदारसंघातील सर्व तालुक्यातील गावागावात आरपीआयचे संघटक आहेत. त्या सर्वांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका व ठिकठिकाणी मेळावे तात्काळ घेतले जाणार आहेत. पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांचा जिल्ह्यात संपर्क चांगला आहे. त्यांना आरपीआयची उमेदवारी द्यावी, अशी मागणी जिल्हा पदाधिकारी यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना भेट घेणार आहेत.
