Breaking News

अग्रलेख अफवांचे बळी...

राज्यातच अफवा पसरवणार्‍या टोळया सक्रिय झाल्यामुळे हक-नाक मुले चोरणारे समजून हल्ले करण्याचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. कोणतीही खातरजमा न करता कायदा हातात घेणार्‍या झुंडशाहीत सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे. यामुळे दारोदार फिरून, भटकंती करत पोट भरणारे कुटुंब या झुंडशाहीच्या हल्ल्यात ठार होतांना दिसून येत आहे. त्यातच समाजमाध्यमांतील अफवांमुळे या अफवांना बळ मिळत आहे. काही महिन्यापूर्वी महिलांच्या बाबतीत देखील अशाच घटना समोर आल्या होता. राज्यात तर एक महिला चेटकीण आहे, ती जादूटोणा करते, अशी चुकीची माहिती समाजमाध्यमांवर फिरत होती, परिणामी संबधित महिलेची बदनामी झाली, व तिच्यावर हल्ला देखील करण्यात आला. तर दुसरीकडे वैजापूर तालुक्यात दोन आदिवासींना चोर समजून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कोणतीही खातरजमा न करता, पोलिसांच्या ताब्यात न देता, झुंडशाहीकडून हल्ले करण्यात येत आहे, याला कुठेतरी अटकाव घालण्याची गरज असून, प्रशासकीय यंत्रणेकडून या अफवांना रोखण्याची आवश्यकता आहे. 
राज्यात सध्या समाजमाध्यमाद्ारे अफवा पसरवणार्‍यांची संख्येत भर पडतांना दिसून येत आहे. त्यामुळे दररोज हातावर पोट भरणार्‍यांना भटकंती करत, भंगार, प्लॉस्टिक जमा करून ते विक्री करून पोट भरणार्‍यांवर हल्ले होतांना दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील काही माणसे भिक्षा मागून पोट भरणारी होती, मात्र त्यांना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण केली, यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यात मुलांच अपहरण करणार्‍या टोळीचे मेसेज समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. या टोळया लहान मुलांचे अपहरण करून विक्री करते, लहान मुलांचे अवयवही विकले जातात, अश्या मेसेजमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात भिक्षा मागून पोट भरणार्‍यांवर संशय व्यक्त केला जात आहे. कोणतीही खातरजमा न करता, पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी त्या व्यक्तींना मारहाण करण्यात येत आहे. या झुंडशाहीच्या प्रकारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अपहरणांच्या घटना अद्यापतरी समोर आलेल्या नाहीत, किंवा पोलिस स्टेशनमध्ये अशा तक्रारी देखील नोंदविण्यात आलेल्या नाहीत.
असे असतांना भिक्षा मागणार्‍यांवर संशय व्यक्त करून त्यांना मारहाण करणार्‍यांची कीव करावीशी वाटते. कारण भिक्षा मागणार्‍या व्यक्तीकडे रोजगाराची कोणतीही साधने नसल्यामुळे भिक्षा हेच त्यांच्या जीवन जगण्याचे साधन आहे. तर काही व्यक्ती रोजगारांच्या शोधात इतर जिल्ह्यात भटकंती करतांना दिसून येतात. मुलं पळवणार्‍या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरुन नागरिकांनी बेदम मारहाण केल्याच्या घटना नांदेड, औरंगाबाद, नंदुरबार आदी ठिकाणी समोर आल्यात. भिकारी, भंगार वेचणारे आणि परप्रांतियांना संतप्त जमावाकडून मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या नांदेडमध्ये अफवांमुळे हा प्रकार सुरु झाला तिथं मुलं पळवल्याची एकही घटना घडली नाही, तशी पोलीस रेकॉर्डमध्ये मध्ये कोणतीही नोंद नाही. केवळ समाजमाध्यमांत पसरवणार्‍या अफवांमुळे जिल्ह्या जिल्ह्यात भिखा मागणार्‍यांवर हल्ले क रत, त्यांना मारहाणीच्या घटना घडत आहे. झुंडशाहीकडून होणार्‍या बेदम मारहाणीमुळे अनेकांना घराबाहेर भिक्षा मागण्याचे सोडून दिले आहे. मात्र अशा झुंडशाहींना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढे येण्याची गरज असून, जनजागृती करण्याची गरज आहे. बीडमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. मात्र पोलीस वेळेवर पोहचले, अन्यथा धुळयांची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागला नसता. धुळयांत पाच जणांचे जीव गेल्यानंतर आता तरी जनतेंनी सजग होण्याची गरज आहे. केवळ समाजमाध्यमांवर फिरणार्‍या संदेशावर विश्‍वास न ठेवता, आपल्या सद्सदविवेकबुध्दीचा वापर करण्याची गरज आहे.