Breaking News

सरकारने प्रत्येक सामान्यांच्या डोक्यावर 64 हजाराचं कर्ज करुन ठेवलंय - जयंत पाटील

मुंबई - समाजाला गुंगीत ठेवून राज्य करणे हा प्रकार सरकार करत असून राज्यावर जवळजवळ 8 लाखाच्या आसपास कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक सामान्य लोकांवर 8 लाख धरले तर 64 हजार रुपयांचे कर्ज करुन ठेवलं असल्याची टिका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना केली. त्यांनी आपल्या भाषणामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सर्वाधिक चिमटे काढतानाच भाजपच्या मंत्र्यांना पक्षात येण्याची ऑफरही दिली. कधी अर्थमंत्री तर कधी मुख्यमंत्री यांच्यावर टिका टिप्पणी क रत आणि मध्येच विनोद करत जयंत पाटील यांनी अर्थमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
9 हा आकडा अर्थमंत्र्यांसाठी शुभ आहे म्हणूनच त्यांनी यावर्षी अर्थसंकल्प 9 तारखेला मांडला गेला. विक्रमी महसुलीचा त्रुटीचा अर्थसंकल्प मांडला तरी अर्थमंत्री म्हणतात की हा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा आहे. अर्थतज्ज्ञ असलेल्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे त्याबद्दल जयंत पाटील यांनी अभिनंदन केले. फडणवीस सरकार सत्तेवर येवून 30 हजार तास झाले असेल तर या तीस हजार तासात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, अनेक महिलांवर बलात्कार झाले, विनयभंग झाले, खुन झाले राज्य सरकारच्या तीस हजार तासात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

चार वर्षात राज्याची परिस्थिती तीच आहे का ? कारण प्रत्येक वर्षी एकच बजेट असतं त्यात फक्त आकडे बदलले जात आहे. काऊंटर सायकलिंगसाठी आपण काय उपाययोजना करणार आहेत ते स्पष्ट नाही. जुलै 1 पासून आपण जीएसटी आणला. त्यात मोठा गोंधळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांना मोबदला देण्याचे काय झाले त्याबद्दल बजेटमध्ये काही दिलेले नाही. केंद्राचे उत्पन्न वाढले मात्र राज्याच्या उत्पन्नामध्ये का वाढ झाली नाही याचं सरकारने दयायला हवे. बजेटमध्ये उत्पन्न का कमी दाखवले आहे त्याबाबत अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे असेही जयंत पाटील म्हणाले. यावर्षी सरकारला केंद्र 2123 कोटी रुपये कमी देणार आहे. मग यावर्षी मोदींचे लक्ष कमी झाले का याचंही उत्तर अर्थमंत्र्यांनी दयायला हवे.