Breaking News

कुडाळात बॅ. नाथ पै यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सिंधुदुर्गनगरी, दि. 22, जानेवारी - बॅ. नाथ पै यांचा एखादा विचार आपण सर्वांनी जोपासला, तर त्याचा आयुष्यात चांगला परिणाम दिसेल, असा विश्‍वास ज्येष्ठ समाजवादी नेते बापू नेरुरकर यांनी बॅ. नाथ पै यांच्या 47 व्या पुण्यतिथीनिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. प्रमुख पाहुण्या म्हणून समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर, कामगार नेते प्रदीप नेरुरकर व माजी आमदार पुष्पसेन सावंत उपस्थित होते.



बॅ. नाथ पै विचारांसाठी जगले. आज विचारांसाठी जगणारी माणसे आपल्याला शोधून सापडणार नाहीत. त्यांचे विचार संस्कार घडविणारे होते. त्यामुळे ते जिथे असतील तिथे सामान्यातील सामान्य कार्यकर्ता पोहचत असे. निवडणुकीसाठी निधी कमी पडला, तरी बॅ. नाथ पै यांच्यासाठी स्वत:जवळ काही नसताना सढळ हाताने मदत करणारे अनेक दानशूर लोक त्या काळात होते. बॅ. नाथ पै यांच्या जीवन प्रवासातील एका प्रसंगाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बॅ. नाथ पै यांनी संस्थाने खालसा विधेयक लोकसभेत आणले. त्यावेळी कोकणातील अनेक संस्थांनी त्यांना विरोध केला. प्रसंगी निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी बॅ. नाथ पै म्हणाले, मी निवडणुकीत पडलो. पण माझे विचार पडणार नाहीत. ते चिरंतन सर्वांच्या स्मरणात राहतील.