Breaking News

मुले चोरीच्या अफ़वेमुळे गुगल इंजिनिअरची जमवाकडून हत्या


बिदर : मुले चोरी होण्याच्या अफवांवरून जमावाकडून होणार्‍या हत्यांचे प्रमाण वाढते आहे. अशाच मॉब लिंचिंगमुळे कर्नाटकातील बिदरमध्येही एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या अफवेमुळे जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मोहम्मद आजम अहमद असे असून तो हैदराबादच्या मलकपेठचा रहिवाशी आहे. हा तरुण गुगलमध्ये इंजिनीअर असल्याची चर्चा आहे. बिदरच्या मुरकी येथे राहणार्‍या बशीर, सलमान आणि अकरम या तीन मित्रांना भेटण्यासाठी मोहम्मद बिदरला आला होता. मित्रांचा निरोप घेत असताना त्यातील एका मित्राने काही लहान मुलांना चॉकलेट वाटायला सुरुवात केली. त्याचवेळी व्हॉट्सअ‍ॅपवर मुले चोरी झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे गावकर्‍यांनी एकत्र जमून या चारही तरुणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगवले आणि तरुणांची सुटका केली. या चारही तरुणांना बिदरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मोहम्मदचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 30 जणांना अटक केली आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर मुल चोरी झाल्याची अफवा पसरविणार्‍या ग्रुप अ‍ॅडमिन आणि फोटो टाकणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.