टोलनाक्यावर मनसेचा राडा, आमदार शरद सोनवणेंवर गुन्हा दाखल
पुणे - रस्त्याची कामे अपूर्ण असूनही टोल वसुली सुरू असल्याने मनसेने पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाका बंद पाडला. त्यामुळे जुन्नरचे मनसे आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे. चाळकवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनाने आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. रस्त्याची अपूर्ण कामे असताना टोल आकारला जात असल्याने सोनवणे यांनी दीडशे कार्यकर्त्यांसह टोल नाका बंद पाडला. जमावबंदी झुगारून केलेल्या आंदोलनामुळे सोनवणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडे सहा वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्यावर्षी या रस्त्याचे उद्घाटन केले होते. या रस्त्यावर यापूर्वी झालेल्या एका अपघातात एकाच वेळी नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 15 जण जखमी झाले होते. या व्यतिरिक्तही या मार्गावर अनेक अपघात झाले आहे. रस्त्या नादुरुस्त असल्याने हे अपघात होत आहेत. यामुळे मनसेने आक्रमक होत हे आंदोलन केले.