Breaking News

श्रीगोंदा नगरपालिकेसमोर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
येथील नगरपालिका कार्यालयासमोर शहरांतील 17 रस्त्यांच्या संदर्भात शिवसेना जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना श्रीगोंदा तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रस्ते दुरुस्तीबाबत व आरोग्यबाबाबत उपाययोजना कराव्यात यासाठी निवेदन देवूनही, काम न झाल्याने पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
श्रीगोंदा नगरपालिकेला दि. 5 जुलै रोजी शहरातील रस्त्यांच्या व आरोग्याच्या संदर्भात रस्त्यावर पडलेले खड्डेदुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले होते. याकामी दि. 11 जुलै पर्यंत कारवाई होण्यासाठी शिवसेनेने मुदत दिली होती. मात्र, यावर पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने, तसेच, दि. 10 जुलै रोजी पालिकेने चुकीच्या पद्धतीने वरचेवर खड्डे बुजवणे चालू केले आहे. परंतु खड्डे बुजविण्यासाठी मातीमिश्रीत मुरूम वापरण्यात येत असून, तो नुकताच खडड्यांमध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण अधिक वाढणार आहे. सदर रस्ते भक्कम स्वरूपात दर्जेदार डांबर वापरून त्यावर, व्यवस्थित रोलर फिरवून पक्के करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पालिकेने साथीच्या रोगांसंदर्भात कसलीही उपाययोजना राबविल्या नाहीत. शिवाय पालिकेच्या कार्यालयातच अस्वच्छता आहे. त्यामुळे पालिका शहरातील स्वच्छता काय करणार? अशाही याठिकाणी आंदोलन कर्त्यांनी प्रश्‍न निर्माण केला.
यावेळी आंदोलनात बोलताना शिवसेनचे जिल्हा समनव्यक घनश्याम शेलार यांनी आपली भूमिका मांडली. पालिका प्रशासन स्वच्छतेच्या गप्पा मारत असले तरी, मात्र पालिकेचे कार्यालयातच इतकी अस्वस्थता आहे तर, शहर कधी स्वच्छ करणार म्हणत, आरोग्य व रस्त्याच्या प्रश्‍नांवर शेलार यांनी नगराध्यक्ष व पालिकेचे मुख्याधिकारी याना चांगलेच धारेवर धरले. जिल्हाधिकारी यांना संबंधित 17 रस्त्याच्या संदर्भात दिलेल्या निवेदनानुसार त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी यावेळी नमूद केले. नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते वर्ग का करून घेतले? असाही यावेळी सवाल करण्यात आला. तसेच सर्वांना समान नियम असावेत, सर्व रस्त्यावर मध्यापासून सीमा निश्‍चित करून अतिक्रमणाचीही कारवाई करावी असेही ते म्हणाले.
यावेळी वाहतूकसेना जिल्हाप्रमुख संजय सांगळे, शहरप्रमुख भाऊ पुराणे, तालुका प्रमुख संजय आनंदकर, नितीन रोही, भाऊसो गोरे, अनिल सुपेकर, अनिल हिरडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.