Breaking News

साबां सचिवालयातील खांदेपालट ; मनोरा आमदार निवास घोटाळा चौकशीच्या मुळावर

आ.चरणभाऊ वाघमारे यांनी भ्रष्टाचाराला सजा देण्याचे आव्हान स्वीकारले
मुंबई/विशेष प्रतिनिधी : मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारतीतील कक्ष दुरूस्तीच्या अपहार प्रकरणात गंभीर ठपका असलेले निलंबित कार्यकारी अभियंता आणि सह अभियंत्यांना फौजदारी कारवाईच्या कक्षेत आणण्याच्या प्रक्रियेला साबांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांच्या बदलीने नजर लावली आहे. ऐन निर्णय क्षणी झालेला हा बदल भ्रष्ट अभियंत्यांच्या पथ्यावर पडला असून या पुर्वी सादर झालेले चौकशी अहवाल बदलण्यासाठी फेर अहवालाची खेळी प्रशासकीय शुक्राचार्य खेळत आहेत. तथापी शेरास सव्वा शेर बनून या पावसाळी अधिवेशनात राजकीय बाजी लावून या भ्रष्ट अभियंत्यांना काळ कोठडीत पाठविण्याचे आव्हान आ.चरणभाऊ वाघमारे यांनी स्वीकारले आहे.
..................................................................................
मनोरा आमदार निवासातील लोकप्रतिनिधींच्या कक्षात बोगस कामे दाखवून लाखो करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवून शहर इलाखा साबां विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके, सह अभियंता भुषण फेगडे, केशव धोंगडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या मंडळींनी शासनाच्या डोळ्यांत धुळ फेकून दाखवलेल्या हातचलाखीचे गांभीर्य पाहिल्यानंतर या मंडळींची बडतर्फी, या मंडळींवर फौजदारी, शासकीय निधीचा अपहार करण्याच्या हेतूने कट रचणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल करून या गुन्ह्याची आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी होणे क्रमप्राप्त होते आणि आहे.
याच दिशेने प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांनी पावले टाकून मुंबई साबां दक्षता पथकाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते, ही चौकशी पुर्ण होऊन अहवाल सादर झाला होता. अ‍ॅक्शन रिपोर्ट तयार होण्याची वेळ आली असतांना प्रशासकीय बदलीचा हंगाम आला. यात आ शिषकुमार सिंह यांची बदली होऊन त्यांचा पदभार मनोज सौनिक यांच्याकडे आला. मनोज सौनिक आशिष कुमार यांच्यासारखे कर्तव्यदक्ष प्रशासक असले तरी या प्रक रणाविषयी अनभिज्ञ आहेत. त्यांच्या या अनभिज्ञतेचा फायदा घेऊन प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्य या पुर्वी सादर झालेला अहवाल बदलण्यासाठी धडपड करीत आहेत. वेळ मारून नेण्यासाठी मुळ अहवालात नसलेल्या उणीवा शोधून फेर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तथापी या प्रश्‍नाला चव्हाट्यावर आणणारे भाजपाचे आ.चरणभाऊ वाघमारे यांनी झारीतील शुक्राचार्यांचे आव्हान स्वीकारले असून भ्रष्ट अभियंत्यांचे हे कारनामे पुन्हा पावसाळी अधिवेशनात सभागृह पटलावर आणून पापाची सजा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार आ. वाघमारे यांनी केला आहे.