Breaking News

दलित मराठा संघर्ष नको ; ऐक्य हवे - रामदास आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून दलित मराठा हे एकजुटीने स्वराज्यासाठी लढले. शिवरायांच्या काळात मावळे म्हणून दलित मराठा एकत्र नांदत होते. आमच्या आरक्षणाला धक्का दिला तर तुम्हाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही . त्यामुळे मराठा समाजाच्या आर्थिक निकषावरील आरक्षणाला आमचा पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन दलित मराठा यांच्यात ऐक्य घडविले पाहिजे संघर्ष होता कामा नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

दादरच्या स्वामीनारायण मंदिर सभागृहात आयोजित शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात आठवले बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सभापती रामराजे नाईक निंबाळकर; महसूलमंत्री चंद्रकांत पाटील; पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर; आमदार भरती लव्हेकर; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 
सर्व आरक्षण आर्थिक निकषावर होऊ शकत नाही. जाती आधारित आरक्षणाला धक्का लागता कामा नये. जे आमच्या आरक्षणाला धक्का देतील त्यांना आम्ही धक्का देऊ. आमच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आर्थिक निकषावर अरक्षण द्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण भारतीय दलित पँथर पासून मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण आर्थिक निकषावरील आरक्षणाचा मुद्दा मांडुन देशभरातील मराठा; जाट गुज्जर; लिंगायत; ब्राह्मण आदी समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आर्थिक निकषावर 25 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आराक्षणाची मर्यादा वाढवून 75 टक्के करण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे प्रतिपादन आठवलेंनी केले.विनायक मेटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ते आमदार आहेत त्यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे पण त्या आधी राज्यात रिपब्लिकन पक्षाला ही मंत्रिपद मिळाले पाहिजे अशी मागणी ना रामदास आठवलेंनी विचारमंचावर केली. 
यावेळी अनेक वक्त्यांनी आमदार विनायक मेंटेना मंत्रिपद देण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपद येते आणि जाते मात्र विनायक मेटे यांना जगातील सर्वात उंच असणार्‍या शिवस्माकाच्या कामाची जबाबदारी दिली आहे. ते काम अजरामर ठरणारे काम आहे. असे सांगत मेंटेना मंत्रिपद देण्याबाबत कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी टाळली. विनायक मेटे हे माझे चांगले मित्र आहेत. मला अडचण आहे असे कळले तर ते दोन पाऊले मागे जातात त्याच पद्धतीने मी मनापासून मेटेंच्या पाठीशी असल्याची शुभेच्छा फडणवीस यांनी दिली. 
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे. त्यासाठी अ ’ आणि ’ब’ अशी वर्गवारी करावी. कोणत्याही कायद्याच्या खेळात मराठा आरक्षण अडकवू नका. ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मराठा आरक्षण टिकू शकत नाही. तसे नाही केले तर सरकारची मराठा आरक्षणाबद्दल नियत खोटी आहे, असे म्हणावे लागेल असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी त्यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना दिला.