Breaking News

राजापूर तालुक्यातील झर्ये पाझर तलाव फुटण्याची भीती

रत्नागिरी, दि. 01, जुलै - राजापूर तालुक्यातील झर्ये येथील अपूर्णावस्थेतील पाझर तलावाला गळती लागली असून तो फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन घरांचा रस्ता वाहून गेल्याने त्यांचे स्थलांतर करण्यात आले असून चार गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर जोरदार पाऊस पडत आहे. राजापूर तालुक्यातील झर्ये येथील धनगरवाडी परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अपूर्णावस्थेतील पाझर तलावाच्या पायथ्यापासून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. तलावाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या दोन घरांच्या दारापर्यंत प्रकल्पाचे पाणी पोहोचले असून तेथील रस्ताही वाहून गेला आहे. त्यामुळे तेथील कुटुंबांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. तलावाच्या खालील भागातून वाहणार्‍या नावेरी नदीकाठावरील चार गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. झर्ये गाव डोंगराळ भागात असून गेल्या डिसेंबरमध्ये तलावाचे काम सुरू झाले होते. तलावाकरिता सुमारे 51 लाखाचा खर्च अपेक्षित असून शंभर हेक्टरपर्यंतचे क्षेत्र बुडीत क्षेत्राखाली येणार आहे. तलावाचे काम अर्धवट असून गेले दोन दिवस या क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला असून त्यावरून वेगाने पाणी वाहू लागले आहे. तलावाच्या पायथ्याला तडे गेले असून त्यामधून पाणी वेगाने येत असल्याने तलाव केव्हाही फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याखालील बुडीत क्षेत्रातील पाचपैकी दोन घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्या घरांकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने तेथील कु टुंबांचा संपर्क तुटला. राजापूरच्या तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांना त्या भागाची पाहणी केली. धोकादायक दोन घरांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या. पावसाचा जोर कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढणार आहे. ते पाणी नावेरी नदीला मिळत असलस्याने नदीची पातळी वाढणार असून नदीकाठच्या कोंडगे, रिंगणे, कुरंग, कोंडगे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नावेरी नदी पुढे अर्जुना नदीला जाऊन मिळत असल्याने अर्जुना नदीकाठच्या जनतेलादेखील सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.
दरम्यान, राजापूरचे आमदार राजन साळवी यांनीही झर्ये गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत राजापूरचे सभापती अभिजित तेली यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.