बसस्थानकासाठी ५ कोटींचा खर्च प्रशासनाला मान्य : आ. कोल्हे
कोपरगाव श. प्रतिनिधी :
मतदारसंघातील रहिवासियांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येणार आहे. या बसस्थानकाच्या इमारत बांधकामासाठी ५ कोटी ९२ लाख ९८ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. या कामाला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या खर्चाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, कोपरगांव बसस्थानकाची सध्याची इमारत अत्यंत जुनी झाली आहे. या इमारतीच्या नुतणीकरणाबाबतचा प्रस्ताव कोपरगांव आगार ते मंत्रालय अशा मार्गाने पाठविण्यात आला. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात लेखाशिर्ष फ- ६ अन्वये नाशिक प्रदेशसाठी द्यावयाच्या निधीतून हे काम मार्गी लावण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार सुधारित प्रशासकीय मंजुरी आदेश दि. ७ जुलै रोजी देण्यात आले आहेत. दरम्यान, प्रशाकीय मंजुरीचे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक तथा कार्यकारी अभियंता यांनी दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री विजय देशमुख, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच मुंबई आणि अहमदनगर आगारराचे विशेष सहकार्य लाभले. याबद्दल आ. कोल्हे यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.
आ. कोल्हे म्हणाल्या, कोपरगांव बसस्थानक सुसज्ज अद्ययावत इमारतीसाठी ३ कोटी ४८ लाख १७ हजार १६३, वाहनतळ भराव कामासाठी ९५ लाख ५५ हजार, संरक्षक भिंत कम्पाउंड २२ लाख १३ हजार ६४१, जुनी इमारत पाडण्यासाठी २ लाख विद्युतीकरणासाठी २३ लाख तर या बसस्थानकांत आग प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ५ लाख असे एकूण ५ कोटी ९२ लाख ९८ हजार रूपये खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पावसाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे. त्यात या प्रश्नावर परिवहनमंत्री रावते यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडून यास मान्यता मिळविली. त्याचबरोबर मतदारसंघातील अन्य विकासकामे व प्रस्ताव तसेच शेतीशी निगडित प्रलंबित बाबी, प्रश्नोत्तर लक्षवेधी बैठकीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी काम सुरू आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बसस्थानकाच्या प्रश्नाला यामुळे चालना मिळेल आणि यामुळे शहराच्या वैभवात भर पडेल, असे मत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, युवकचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते योगेश बागुल, रविंद्र पाठक, केशव भवर, त्र्यंबक सरोदे, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, मच्छिंद्र केकाण, मच्छिंद्र टेके, सुनिल देवकर आदींसह भाजपा पदाधिका-यांनी आ. कोल्हे यांचे अभिनंदन केले.
