Breaking News

धोकादायक पुलाच्या वापरावर विटांच्या भिंतीचे निर्बंध!


कोल्हार खुर्द प्रतिनिधी

येथील प्रवरा नदीपात्रावर असलेल्या जुन्या पुलाची अवस्था गेल्या पाच वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली आहे. हा पूल अवजड वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचे चार वेळेस प्रयत्न केले. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे या पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरूच होती. अखेर या विभागाने सदर पुलाच्या दोन्ही बाजूला विटांचे बांधकाम करून हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला. 

कोल्हार खुर्द येथील प्रवरा नदीपात्रावरील जुना पूल गेल्या दोन वर्षांपासून अवजड वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक झाला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे फलक सुरुवातीला पुलाच्या समोरील बाजूला लावण्यात आले. मात्र हे फलक अवघ्या पंधरा दिवसांत रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांनी तोडून टाकले. वाहन चालकांनी कुठल्याही सूचनांचे पालन न करता या पुलावरून सोयीस्कर पद्धतीने वाहतूक सुरु केली. त्यानंतर पुन्हा संबंधित विभागाने पुलाच्या सुरुवातीला मैलाचे दगड लावून त्यावर रेडियम लावले. सदर पूल वाहतुकीसाठी बंद असल्याचे जाहीर केले. मात्र हे दगडदेखील काही लोकांनी पाडून वाहतूक सुरु केली. यानंतर मात्र संबंधित विभागाने सदर पुलावर भले मोठे लोखंडी बॅरिएर उभे केले आणि त्यावर आडवे लोखंडी चॅनेल टाकून सदर पूल वाहतुकीसाठी बंद केला. परंतु हा प्रयत्नदेखील सदर विभागाचा फोल ठरला. हे लोखंडी बॅरिएर अज्ञात चोरटयांनी दोर लावून पाडून चोरून नेले. तब्बल चार वेळा हा ग्रामस्थ, प्रवाशी नागरिकांच्या जिवितासाठी धोकादायक असल्याने वारंवार उपाययोजना करून या विभागाला वाहन चालक आणि नागरिकांनी आव्हानच दिले. त्यामुळे विभागाने पुलावर दोन्ही बाजूने विटांचे पक्के बांधकाम करून पुलावरील अवजड वाहतूक बंद केली.