Breaking News

निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीत सर्व निधर्मीवाद्यांनी एकत्र यावे - प्रकाश आंबेडकर


आगामी 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीत सर्व निधर्मीवाद्यांनी एकत्र यावे. अल्पसंख्यांक मागासवर्गीयांना निवडून आणू, असा विश्‍वास व्यक्त करत सत्ता संपादन करणे हाच आपला उद्देश असल्याची भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. मुले पळविणारे असल्याच्या संशयावरून मंगळवेढ्यातील भटक्या समाजाच्या पाच जणांची धुळे जिल्ह्यात जमावाने निर्घृण हत्या केली होती. या मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी बुधवारी अ‍ॅड. आंबेडकर सोलापूरच्या दौ-यावर होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, की 2019 मध्ये सत्ता संपादन करणे हा आमचा मूळ हेतू आहे. त्यासाठी सर्व निधर्मीवाद्यांनी (सेक्युलर) बहुजन वंचित आघाडीच्या निमित्ताने एकत्र यावे, असा आपला प्रयत्न आहे. परंतु, निवडणुकीत दोन धनगर, दोन माळी, दोन भटक्या-विमुक्त, दोन मुस्लीम व इतर सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना संधी देणे बंधनकारक राहणार आहे. ज्यामध्ये लोकशाहीचे सामाजिकरण झाले पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. तसेच येत्या निवडणुकीत राज्याचा एक विकासाचा जाहीरनामा आणि दुसरा प्रत्येक जिल्ह्याचा विकासाचा जाहीरनामा असणार आहे. त्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.