खेडच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार रामभरोसे, दवाखाना बनला लघुशंकास्थळ
किरण जगताप / कुळधरण
कर्जत तालुक्यातील खेडच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था झाल्याने, दवाखाना अडगळीचे ठिकाण बनले आहे. सतत कुलुपबंद असलेल्या दवाखान्याचे कुंपण तसेच प्रवेशद्वाराची दुरावस्था झाली असुन, परिसरात गवत वाढल्याने हे अडगळीचे ठिकाण बनले आहे. जनावरांना उपचारासाठी उभा करण्यासाठी बनविण्यात आलेले संरक्षक लोखंडी कठडे उचकटुन जमिनदोस्त झाले आहेत. दवाखान्याच्या दुरास्थेमुळे पशुपालकांना सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे कर्जतच्या पशुसंवर्धन विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे.
खेड येथे ग्रामपंचायत कार्यालय मार्गावर जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना आहे.शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्चून इमारत बांधण्यात आली. इमारतीजवळच दगडी बांधकाम करुन त्यावर, तारेचे कुंपण लावण्यात आले. तसेच पुढील भागात मोठे लोखंडी प्रवेशद्वार बसविण्यात आले. या भागातील पशुपालकांपर्यंत शासनाच्या योजना व उपक्रम पोहोचविण्यासाठी हा मध्यवर्ती पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र सध्या दवाखान्याला उतरती कळा लागलेली आहे. दवाखाना नियमित उघडला जात नसुन, परिसरात गवत वाढलेले आहे.दवाखाना अडगळीची जागा बनल्याने त्याचा नागरिकांकडुन लघुशंका करण्यासाठी वापर होत आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना बियाणे, जनावरांचे रेतन, शस्रक्रिया, तपासणी, उपचार आदी सुविधा दिल्या जातात. शासनाच्या वतीने जनावरांसाठी अल्पदरात तसेच मोफत सुविधा दिल्या जातात. जनावरांच्या चार्यासाठी मका, कडवळ आदी बियाण्यांचा पुरवठा केला जातो. शेतकर्यांनी तयार केलेल्या गटांनाही विभागाकडून सेवा तसेच, साधनांचा पुरवठा केला जातो. मात्र येथुन पशुपालक शेतकर्यांना सुविधा मिळणे मुश्किल झाले आहे. पशुपालक अनेक सुविधांपासुन वंचित असल्याचा प्रकार समोर येत आहे. या भागातील औटेवाडी, वायसेवाडी, आखोणी, खैदान आदी गावातही विभागाच्या योजना पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक व कर्मचारी कामावरच येत नसुन कागदावरच योजना राबविल्या जात असल्याचा प्रकार सर्रासपणे घडत आहे. काही दवाखान्यात कर्मचार्यांच्या निवासस्थानाची सोय केलेली असूनही, कर्मचारी वास्तव्यास राहत नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारून जात असतानाही, दवाखान्यात कोणीच भेटु शकत नाही.
इमारतीच्या बांधकामाला बाधा
खेड भागातील पशुपालकांच्या सोयीसाठी शासनाने चांगली इमारत बांधली. मात्र दुर्लक्षामुळे इमारत, कंपाउंड, गेटची बिकट अवस्था झाली आहे. दवाखान्यात कर्मचार्यांचा वावर होत नसल्याने उंदीर घुशीकडुन इमारतीला बाधा पोहचवून ती भग्न होत आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कर्मचारी दवाखान्याकडे फिरकत नसल्याने शेतकर्यांना कसल्याच सुविधा मिळत नाहीत. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी.
- सतिष मोरे, उपाध्यक्ष
कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस
प्रशासनाने पशुपालकांना न्याय द्यावा
पशुधन ही शेतकर्यांची कामधेनू आहे. शासनाकडून पशुसंवर्धनासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र खेडच्या दवाखान्याची सध्या दुरावस्था पहावयास मिळत आहे. यामध्ये तालुका प्रशासन व कर्मचारी कमी पडत आहेत. याकामी विभागाच्या प्रशासनाने योग्य कार्यवाही करुन पशुपालक शेतकर्यांना न्याय द्यावा.
- मारुती सायकर,
माजी पंचायत समिती सदस्य, कर्जत
भांबोरा येथील कर्मचार्याकडे पदभार
खेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पद रिक्त आहे. तेथील पदभार भांबोरा येथील कर्मचार्याकडे आहे. त्यांना दोन्ही गावांसाठी वेगवेगळे वार ठरवून देण्याचे नियोजन करीत आहोत. 15-20 दिवसांत नविन कर्मचारी दाखल होतील. त्यामुळे अडचणी दूर होतील.
- कुलदीप चौरे,
तालुका पशुधन अधिकारी,
पंचायत समिती कर्जत
