Breaking News

रजनीकांतचा राजकारणात प्रवेश,नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत.

चेन्नई/वृत्तसंस्था : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या राजकीय प्रवेशाचे संकेत दिले असून, त्यानिमित्ताने त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचे स्पष्ट केले आहे. रजनीकांत हे तामिळनाडू मधील लोकप्रिय व्यक्तीमत्व असून, त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळे प्रस्थापितांना मोठा हादरा बसला आहे. चेन्नईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात रजनीकांत यांनी ही घोषणा केली. राज्यातले राजकारण बदलण्याची गरज आहे. 


तामिळनाडूतील राजकारण खूपच वाईट झाले आहे. लोकशाही मरणपंथाला लागली आहे. गेल्या वर्षभरात तामिळनाडूच्या राजकारणात झालेल्या घडामोडींमुळे राज्य बदनाम झाले आहे. इथे असलेला पारदर्शकतेचा अभाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करु’ अशा भावना रजनीकांत यांनी यावेळी बोलून दाखवल्या. रजनीकांत यांच्या स्टाईलची फक्त दाक्षिणात्यच नाही, तर देश-विदेशातील प्रेक्षकांवर मोहिनी आहे. त्यांना असलेल्या मोठ्या चाहत्यावर्गाचा राजकीय क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रजनीकांत यांनी नव्या पक्षाचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. तामिळनाडूत करुणानिधी, जयललिता यासारख्या अनेकांनी अभिनय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. रजनीकांत ही परंपरा कशी सुरु ठेवतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, तामिळनाडूच्या सर्वच विधानसभा जागांवरून निवडणूक लढवणार अशी घोषणा सुद्धा केली आहे. फॅन्सशी संवाद साधताना रजनीकांत म्हणाले, सध्याची लोकशाहीची परिस्थिती काही चांगली नाही. दुसरे राज्य आमच्या (तामिळनाडू) राज्याची थट्टा करत आहेत. राजकीय पक्ष स्थापित करून राजकारणात न उतरल्यास मी स्वतःलाच दोषी मानले असते. लोकशाहीच्या नावे आमचे नेते आमच्याच जमीनीवर आम्हाला लुटत आहेत. आपल्याला मूळ सुधारावे लागणार आहे. गेल्या 5 दिवसांपासून ते आपल्या फॅन्सशी संवाद साधत आहेत. रविवारचा दिवस फॅन्सच्या भेटीचा शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे, तामिळनाडूत विधानसभेच्या 234 जागा आहेत. तसेच प्रत्येक मतदार संघात रजनीकांतचे किमान 25 ते 30 हजार समर्थक आहेत. त्यामुळे, तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसाठी रजनीकांत सर्वात मोठे आव्हान ठरणार आहेत.