Breaking News

अडबंगनाथ पायी दिंडीचे उत्साहात स्वागत


राहुरी तालुका प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्याच्या भामाठान येथील श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान येथून पंढरपूरला निघालेल्या पायी दिंडीचे राहुरी फॅक्टरी येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महंत अरुणनाथगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली ही दिंडी निघाली आहे. 

कपाळी केशरी गंध, मुखी विठोबाचे नाम, टाळ मृदुंगाचा गजर करत अडबंगनाथ देवस्थान येथून शेकडो भाविक पंढरीच्या दिशेने निघाले. राहुरी कारखाना येथे गिरीश थोरात यांच्या निवास्थानस्थानी मुकाम व प्रसाद व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महंत अरुणनाथगिरी महाराज व पालखी पूजन संपन्न झाले. प्रसंगी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड, शिवाजी घाडगे, श्रीकांत जाधव, सौरभ घोलप, भास्कर आढाव, प्रमिला कोळसे, भास्कर पानसंबळ, रवी ढूस आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना महंत अरुणनाथगिरी महाराज म्हणाले, जीवन जगत असताना गुरु करणे आवश्यक आहे. आपल्याला दिशा देण्याचे काम गुरु करत असतात. गुरुवर्य महंत नारायणगिरी महाराज यांनी दिलेला गुरुमंत्र व दिलेली दिशा प्रमाण मानून स्वामी अडबंगनाथ महाराजांची सेवा करत आहे. दरम्यान, पंढरपूरला जाऊन विठोबाचे मनोभावे दर्शन करुन दिंडी आश्रमात परतणार आहे. त्यानंतर दि. २७ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी गणेश भांड यांनी वारकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. महंत अरुणनाथगिरी महाराज यांचे शिष्य बालकीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज काकडे यांनी विनोदी शैलीत किर्तन करत उपस्थित भाविकांची मने जिंकली.