Breaking News

खा. शेट्टींच्या वक्तव्यावर ख्रिश्‍चन समाजबांधवांकडून निषेध


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
भाजपाचे खा. गोपाळ शेट्टी यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात ख्रिश्‍चन समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने वक्तव्य केले. याचा निषेध म्हणून श्रीगोंद्यातील ख्रिश्‍चन समाज बांधवांनी स्थानिक प्रशासनास निवेदन सादर करीत शेट्टीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे. श्रीगोंद्याचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
मुंबई येथील एका कार्यक्रमात ख्रिश्‍चन समाज हा देशाच्या स्वातंत्र्यात देशाबरोबर नव्हता, असे बोलून ख्रिश्‍चन समाजाच्या देशभक्तीवर प्रश्‍नःचिन्ह निर्माण करून, समाजाला बदनाम करून आमच्याविषयी द्वेषभावना पसरविण्याचे काम खा. गोपाळ शेट्टी यांनी केले, असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वक्तव्याचा श्रीगोंद्यातील ख्रिश्‍चन समाजाने तीव्र निषेध नोंदवत, गोपाळ शेट्टींनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे. यापुढे अशा पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केल्यास संघटित होवून जश्यास तसे उत्तर दिले जाईल, असे यावेळी शासनाला व प्रशासनाला दिलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे.
सदरील निवेदन नायब तहसीलदार गायकवाड यांना देत शासनापर्यंत भावना पोहचविण्यासाठी समाजामार्फत विनंती करण्यात आली. यावेळी सतीष भालेराव, शरद देवडे, विक्की कांबळे, अभिजित कांबळे, राजू शिंदे, रमेश गरुड, संदेश भालेराव, संतोष गरुड, प्रताप रणशिंग, जॉन कांबळे, संकल्प पाडळे, अनिकेत निमगावकर, अमोल आढाव, स्वप्नील शिंदेंसह समाज बांधव उपस्थित होते.