Breaking News

राज्यात ४ दिवसात झाले २ कोटी वृक्षारोपण - मुनगंटीवार

राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असला तरी १ ते ४ जुलै या चार दिवसांमध्येच राज्यातील वृक्षलागवडीने २ कोटी चा टप्पा पार केला आहे. ४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत राज्यात २ कोटी ०१ लाख २३ हजार ३०३ वृक्ष लागले गेल्याची नोंद वन विभागाकडे झाली आहे. राज्यात १ जुलै पासून वृक्षलागवडीस सुरुवात झाली असून १ लाख ४५ हजार ६८३ वृक्षलागवडीचे स्थळ नोंदवले गेले आहेत. यामध्ये २ लाख ९६ हजार ७७१ लोकांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये वैयक्तिक स्तरावर तसेच संस्थात्मक स्वरूपात केलेल्या वृक्षलागवडीचा समावेश आहे. वन विभागाच्या संकेतस्थळावर दर मिनिटाला या आकडेवारीत बदल होत असून लावलेल्या वृक्षांची नोंद विभागाकडे होत आहे. वैयक्तिक पातळीवर वृक्ष लागवड करणाऱ्या व्यक्तींना त्यांची वृक्षलागवड वन विभागाकडे नोंदवता यावी यासाठी गुगल प्ले स्टोअरवर “माय प्लांट” नावाचे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याद्वारेही वृक्षारोपणाची नोंद विभागाकडे होत आहे. राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पपुर्तीसाठी अबालवृद्ध उत्साहाने वृक्षलागवड करत असून आतापर्यंत राज्यात सर्वाधिक वृक्षलागवड मराठवाड्यात नांदेड येथे झाली आहे. येथे आतापर्यंत ३३ लाख १ हजार ८१६ वृक्ष लागले आहेत. चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे १२ लाख ३०६ वृक्ष लागले आहेत. त्यापाठोपाठ तिसऱ्याक्रमांकावर लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ११ लाख १२ हजार ७६८ वृक्ष लागले आहेत. यवतमाळ येथे १० लाख ३३ हजार ०३५, गडचिरोली जिल्ह्यात १० लाख २५ हजार ४००, पालघरमध्ये ९ लाख ५५ हजार ४८६ वृक्ष लागले आहेत. अहमदनगर, बीड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये ८ लाखांहून अधिक वृक्षारोपण झालेय. हरित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी राज्यात तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लावले जाणार आहेत. पहिल्या वर्षी ४ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असतांना राज्यात ५ कोटी ४३ लाख वृक्ष लागले. राज्यातील जनतेने वृक्षलागवडीचा उत्सव साजरा केला. हे अभियान ना केवळ यशस्वी केले परंतू संकल्पापेक्षा अधिक वृक्षलागवड राज्यात झाली. याची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली. यावर्षी ही १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प व्यापक लोकसहभागातून नक्की पूर्णत्वाला जाईल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.