Breaking News

मंत्रालयातील पेव्हर ब्लॉक झाले अदृश्य! रणजीत हांडे, प्रज्ञा वाळके यांच्या संगनमताला सुर्यवंशीचे पाठबळ

मुंबई/ विशेष प्रतिनिधी - मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या विविध मंडल कार्यालयात सुरू असलेला विविध स्तरावर सुरू असलेल्या अपहार भ्रष्टाचाराला वरिष्ठ स्तरावरील अभियंता पाठीशी घालत असल्याचा पुरावा स्वातंत्र्य दिनी मंत्रालयातील अदृश्य पेव्हर ब्लॉक अपहारातुन पुन्हा उघड झाले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातही शहर इलाखा साबां विभागाची वादग्रस्त कार्यशैली चर्चेत आहे. सन 2014- 2017 या कालावधीत शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रणजीत हांडे व प्रज्ञा वाळके यांनी पेव्हर ब्लॉक आणि मंत्रालयाशी संबंधित अन्य कामात केलेली हातसफाई सिध्द झाल्यानंतरही अधिक्षक अभियंता अरविंद या कार्यकारी अभियंत्यांना धडा शिकविण्याऐवजी त्यांचे कृष्ण कृत्य झाक ण्यात अधिक्षक अभियंता अधिक स्वारस्य दाखवित असल्याचे घडामोडींवरून स्पष्ट होते. अर्थात अधिक्षक अभियंत्यांच्या या भुमिकेला साबां प्रशासनातील उच्च पदस्थांचे आशीर्वाद असल्याची स्फोटक माहीती हाती आली आहे.


राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात उंदरांचा वावर आणि त्यांचे निर्मुलन करतांना बौध्दिक कौशल्य दाखवलेल्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, उपअभियंता अशोक बागूल, शाखा अभियंता रेशमा चव्हाण यांच्या पापक्षालनासाठी अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांचे अथक परिश्रम साबांतील कृष्ण कृत्यांना चालना देत असल्याची चर्चा मंत्रालयातील पेव्हर ब्लॉक अपहार प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे. सन 2014 मध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी मंत्रालयात विशिष्ट भागात पेव्हर ब्ला ॅक बसविण्याचा प्रस्ताव शहर इलाखा साबांचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांनी मंजूर केला. 15 आगस्ट 2014 रोजीच्या कार्यक्रमासाठी मंत्रालय इमारतीतील मुख्य बिल्डींग ते विस्तारीत बिल्डींग, आरसा गेट ते विस्तारीत बिल्डींग मध्ये तसेच गार्डन गेट ते विस्तारीत बिल्डींग गेट नंबर 6 ते 7 व आरसा गेट ते गेट नंबर 4 मध्ये पेव्हर ब्लॉक लावण्याचे प्रयोजन या प्रस्तावात होते. कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांनी दि. 6 फेब्रुवारी 2014 रोजी एकाच दिवशी पुर्णिमा मजूर सह. संस्था आणि विनायक मजूर सह. संस्था या दोघांना सदर कामांचा कार्यारंभ आदेश दिले, यात पुर्णिमा मजूर संस्थेला 14,78,993 तर विनायक मजूर संस्थेला 9,91,025 या सममुल्य रकमेचा ठेका मंजुर केल्याच्या कार्यारंभ आदेशात काम पुर्ण करण्याचा कालावधी दोन महिने इतका दर्शविला होता.
एस आकार आणि 203 बाय 101 सेमी आकारमान असलेले पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या या कामासाठी या दोन्ही कंत्राटदारांना काम पुर्ण केल्याचा पडताळणी अहवाल देऊन दि. 24 मार्च, 22 मे, व दि. 16 ऑक्टोबर 2015 रोजी दोन्ही कंत्राटदारांना या कामांचे देयके अदा केली. या काळात शहर इलाखा साबां विभागाचा प्रभार कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या कडे होता, याचा अर्थ कार्यारंभ आदेश दिला रणजीत हांडे यांनी तर देयके अदा केली प्रज्ञा वाळके यांनी. या ठिकाणी काम कुणाच्या कार्यकाळात झाले यापेक्षा सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्या आहेत का? हे अधिक महत्वाचे ठरते. या मुद्यावर अधिक माहिती घेतल्यास रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांनी पेव्हर ब्लॉक कामात संगनमत करून शासनाची दिशाभुल केल्याचे माहीतीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या कागदपत्रांवरून उघड झाले आहे.ज्या पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी या शहर इलाखा साबां विभागाने 2015 मध्ये जववपास चोवीस लाखाचे देयके अदा केली, ते पेव्हर ब्लॉक कार्यारंभ आदेश दिल्याच्या तारखेपासून हे वृत्त प्रसिध्द होईपर्यंत एकदाही मंत्रालय परिसरात दिसले नाहीत. हे पेव्हर ब्लॉक गेले कुठे? हा गुढ प्रश्‍न साबां प्रशासनाला पडला असून अदृश्य पेव्हर ब्लॉक प्रकरणात रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके या दोघांचाही सारखा सहभाग असल्याची चर्चा साबांत आहे.
मंत्रालय आणि आमदार निवास अपहार अशा विविध प्रकरणांत सहभाग असल्याच्या संशयावरून अडचणीत असलेल्या प्रज्ञा वाळके यांच्या मदतीला सतत धावून येणारे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी या पेव्हर ब्लॉक प्रकरणातही प्रज्ञा वाळके आणि रणजीत हांडे यांना पाठीशी घातल्याचे बोलले जात आहे. अरविंद सुर्यवंशी यांच्या या भुमिकेला साबां प्रशासनातील एका उच्च पदस्थाचा आशीर्वाद असल्याची खात्रीशीर माहीती लोकमंथनच्या हाती आली आहे.