Breaking News

दूध दरवाढ आंदोलन पेटले मालेगावात दुधाचा टँकर जाळण्याचा प्रयत्न बंदुकीच्या जोरावर दूध उत्पादकांची गळचेपी करणार का? विरोधकांचा सरकारला सवाल

 नागपूर/पुणे : स्वाभिमानी संघटनेने दूध दरवाढीसाठी सोमवारी पहाटे दोन वाजल्यापासून आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाला जिल्ह्यातूनही पाठिंबा मिळत असून या आंदोलनास आता हिंसक वळण लागले आहे. दूध दरवाढीच्या मागणीसाठी आजपासून मुंबई शहराला होणारा दूध पुरवठा बंद करण्यासाठी स्वाभिमानीकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज मालेगावातही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एक दुधाचा टँकर जाळण्याचा प्रयत्न केला. दूध संघाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले. याचा पाच दूध संघांना फटका बसला आहे. क्रांती, माऊली, कृष्णाई, मातोश्री, सोनई दूध संघावले ब्रिज, सोलापूर हडपसर रोड या भागातील गाड्या फोडून दूध रस्त्यावर फेकून दिले आहे. राज्यातील अनेक भागात दूध पुरवठा रोखून दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. तर, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दूध उत्पादकांच्या वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे मुंबईत दुधाचा साठा केल्यामुळे कोणतीही कमतरता भासणार नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंदला रविवारपासूनच वाळवा तालुक्यातील येवलेवाडी (ता. वाळवा) नजीक हिंसक वळण लागले. जिल्ह्यात पहिली ठिणगी पडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे निघालेल्या दुधाच्या टँकरच्या काचा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी येवलेवाडीनजीक फोडल्या. दगडफेक करून टँकरच्या समोरच्या काचा फोडून टँकरमधील दूध रस्त्यावर सोडले. गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, यासाठी आजपासून दूध संकलन, तसेच वाहतूक बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत दूध उत्पादक कृती समितीने एक दिवस संकलन बंद करण्यास मान्यता दिली आहे. या आंदोलनात गोकुळ दूध महासंघही सहभागी झाला.
दरम्यान, दुध दरवाढीवरून सुरू झालेले आंदोलनाची धग सोमवारी विधीमंडळात देखील जाणवली. विरोधकांनी दुध दराबाबत सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा उचलून धरला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच दुधाच्या दराबाबत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विखे-पाटील म्हणाले, की सरकार म्हणते पोलीस बंदोबस्तात दूध मुंबईला पाठवू, म्हणजे बंदुकीच्या जोरावर सरकारला दूध उत्पादकांचे आंदोलन दडपायचे आहे का. शेतकर्‍यांचा कळवळा दाखवणारी शिवसेना आज का गप्प आहे? असा सवाल देखील विखे यांनी केला. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत उद्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेण्याचे आश्‍वासन विरोधकांना दिले. खाजगी दूध संघ आणि कंपन्यांसाठी दूध भुकटी निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात आले आहे. खाजगी संस्थांनी गेल्यावर्षी केलेली भुकटी स्टोर केली असून त्याचे अनुदानात निर्यात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी दुधाला जो दर देण्याची घोषणा सरकारने केली होती. तीन-तीन वर्षे न्याय मिळत नसेल तर शेतकर्‍यांनी कुणाकडे पाहावे.आज शेतकर्‍यांना प्रति लिटर दुध निर्मिती करण्यासाठी 25 ते 30 रुपये खर्च येतो. मात्र शेतकर्‍यांना दर किती मिळतोय तर 17 ते 20 रुपये हे नुकसान शेतकर्‍यांनी कसे सोसायचे. दुष्काळी भागातही पोट भरण्यासाठी दुधाच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह चालतो, यावर सभागृहात त्वरित चर्चा घ्यावी..