सातारा शहरात 75 हजार रुपयांचा गुटखा जप्त
सातारा, 1 - महाराष्ट्र राज्यात गुटखा, पानमसाला, तंबाखू, सुगंधीत सुपारी, मावा इत्यादी अन्न पदार्थांवर विक्री, साठा व वितरणावर प्रतिबंध केला असताना सातारा शहरातील काही ठिकाणी छुप्या पध्दतीने या पदार्थांची विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच विशेष मोहिम राबवून 75 हजार 9 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र रुणवाल यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन सातारा यांनी अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक पोलीस यांच्या 7 पथकाची नियुक्ती करुन शहरामध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये एकूण 58 ठिकाणची तपासणी केली असता प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरु असल्याचे आढळले. या प्रकरणी सर्व विक्रेत्यांविरुध्द अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोहिमेत सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली इत्यादी ठिकाणचे अन्न सुरक्षा अधिकारी तसेच पुणे येथील सहाय्यक आयुक्त (अन्न) दि. तु. संगत व सहाय्यक आयुक्त रुग्णवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकरी दत्ता साळुंखे, इम्रान हवालदार, उदय लोहकरे, राजेंद्र काकडे, श्रीमती वंदना रुपनवर, मेघना पवार, शुभांगी अंकुश यांचा समावेश होता.