Breaking News

इच्छामरणासाठी शेतकर्‍याची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव


अमरावती : कर्जमाफी न मिळाल्याने जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर आपली साडेचार एकर शेती शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहून हा स्टॅम्प पेपर मुख्यमंत्री कार्यालयाला या शेतकर्‍याने पाठवला आहे. इच्छामरणाची मागणी करणार्‍या दर्यापूरच्या प्रमोद कुठे या शेतकर्‍याची शनिवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली. कुठे हे त्यांच्यावर असलेले कर्ज नित्यनेमाने भरतात. 2017 मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून आणि नातेवाईकांकडून कर्ज काढून कर्ज फेडले. कर्जाची परतफेड झाल्यानंतर त्यांनी नवीन कर्ज घेतले. मात्र, या नवीन कर्जावर त्यांना माफी मिळाली नाही. हे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. या शेतकर्‍याने राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यालयाशीदेखील पत्रव्यवहार केला आहे. हे सरकार आता जाण्याचे दिवस आल्याने असा आत्मघातकी निर्णय घेऊ नये, अशी कुठे यांची समजूत पटोले यांनी काढली. पावसाळी अधिवेशनात त्यांचा कर्जमाफीचा मुद्दा मांडायला सांगु, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.