Breaking News

समतेचे तत्व अंगिकारल्याखेरीज तरणोपाय नाही : मेटे


अहमदनगर प्रतिनिधी :

मध्ययुगीन कालखंडात सुरू झालेली वारकरी परंपरा वर्षानुवर्षे अबाधित आहे. पंढरीच्या वारीमध्ये जातीभेद, वर्णभेद अथवा लिंगभेद अशा कोणत्याही विषमतावादी तत्वास थारा नाही. तेथे समतेचे तत्व अंगिकारले जाते. खऱ्या अर्थाने लोकशाहीची पायाभरणी ही संत साहित्यातून झालेली दिसते. मात्र संत, महापुरुषांच्या विचारांचे आचरण होत नसल्याने आजची पिढी दिशाहीन झालेली आहे. या भरकटलेल्या समाजास उन्नती साधायची असल्यास विठ्ठलासमोर नतमस्तक होऊन समतेचे तत्व अंगिकारल्याखेरीज तरणोपाय नाही, असे मत संत साहित्याचे अभ्यासक तथा युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष ह. भ. प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी केले.

लोकरंग प्रकाशन प्रस्तुत आणि मेटे महाराज लिखित 'वारकरी संवाद' या पुस्तिकेचे वारकर्‍यांच्या हस्ते रुईछत्तीसी येथील महादेव मंदिरामध्ये नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व ह. भ. प. ईश्वर महाराज नवसुपे, बाळासाहेब बोरकर महाराज, समितीचे बीड जिल्हाध्यक्ष, सोमनाथ मेटे महाराज, मच्छिंद्र गोरे, येणारे महाराज, राम खाकाळ, रामदास वाडेकर, बापु कदम, विठ्ठल खाकाळ, संभाजी साखरे महाराज, दत्तू बनसोडे, अंबादास जगताप, दत्ता गोरे, संतुराम वाडेकर, चौधरी बापू, अशोक खाकाळ, आंबादास कदम, अशोक भवर, नवनाथ जाधव, मच्छिंद्र खाकाळ आदी उपस्थित होते. समितीचे संघटक प्रा. प्रकाश साळवे यांनी प्रास्ताविक केले. युवक प्रबोधन समितीचे बीड जिल्हाध्यक्ष सोमनाथ मेटे महाराज यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी उपस्थित होते. वारकरी सवांद या पुस्तिकेचे वारकर्यांनी स्वागत केले आहे. पंढरीच्या वारीत पुस्तिकेचे वितरण केले जात आहे.