पूर्व वैमनस्यातून दोघांवर सशस्त्र हल्ला
जामखेड / श. प्रतिनिधी
मागील भांडणाच्या कारणावरून जामखेड बीड रोडवरील पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकल अडवून तलवार व लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला करून, गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध आर्म अॅक्ट व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात असुन आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 9 रोजी फिर्यादी अशोक महादेव पठाडे (वय 30 वर्षे) रा. नाळवंडी ता. पाटोदा. जि. बीड हे मागील केसच्या माहितीसाठी जामखेडला वकीलाकडे आले होते. यावेळी त्यांचा मित्र संतोष गव्हाळेबरोबर साकत फाटा येथे सायंकाळी मोटारसायकलवरून चालले होते. तेंव्हा लघुशंकेसाठी थांबले असता, आरोपी इकबाल जानमहंम्मद पठाण व खान सर (पुर्ण नाव माहीत नाही) दोघेही रा. नाळवंडी. ता. पाटोदा यांच्यासह इतर तीन जण असे एकूण पाच जणांनी चार चाकी गाडीने तलवार, लोखंडी रॉड व दांडके घेवून आले, आणि माझ्या वडिलांना का मारले असे म्हणत हल्ला केला. यामध्ये फिर्यादी व संतोष गव्हाळे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचही आरोपी फरार असून त्यांच्यावर अशोक महादेव पठाङे यांच्या फिर्यादीवरून खूनाचा प्रयत्न व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करत आहेत.
खोटी केस करून खटला कमकवूत करण्याचा प्रयत्न : डॉ पठाण
सदर घटना मनगडंत असून, माझ्या केसमधील आरोपींनी माझ्या कूटुंबावरती जाणुन बूजून आरोपींकडून खोटी केस दाखल केली आहे. जामखेड येथे 1 फेब्रु 2018 रोजी जामखेड पंचायत समिती कार्यालयसमोर भरदिवसा मी डॉ. सादीक पठाण व कय्यूम शेख यांच्यावर चारचाकी गाडीतून जात असताना हल्लेखोरांनी गोळीबार करून, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याविषयी जामखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे. आरोपीपैकी जामीनावर मुक्त झालेल्या एकाच्यावतीने डॉ. सादिक पठाण यांचे बंधू इकबाल पठाण व नातेवाईक खान सर व इतर तीन अज्ञात यांच्या विरोधात 307 हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने, सदर गुन्हा खोटा असुन अशा आशयाचा गुन्हा आमच्या कुटुंबीयाच्या वतीने करण्यात आला नसून, हा केवळ आमच्या कुटुंबावर आकसापोटी केलेला अन्याय आहे. त्यामुळे सदर गुन्ह्याची शहानिशा करून चौकशी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन डॉ.सादीक पठाण व त्यांच्या नातेवाईकांच्यावतीने जामखेड तहसिलदार व पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे. यावेळी डॉ. सादीक पठाण यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, काल घडलेल्या घटनेशी माझ्या कूटुंबातील कोणाचाही संबंध नाही. जाणून बूजून माझ्यावरील झालेल्या गोळीबार केसला कमकवूत करण्याचा हा कट रचला आहे. त्यांची शहानिशा करून चौकशी करण्यात यावी.