भाजपकडून "लाड"तर कॉंग्रेसकडून "माने" यांना उमेदवारी
विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई : शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुकांच्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा विधानपरिषेदतला पत्ता कट झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आयात झालेल्या प्रसाद लाड यांना लॉटरी लागली आहे.
विधानपरिषद पोटनिवडणुसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी देखील सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. या निवडणूकीत सर्वात जास्त चर्चा ही नारायण राणे यांच्या उमेदवारी वरून सुरू होती. मात्र शिवसेनेचा कडवा विरोधामुळे राणे यांना बाजूला सारत लाड यांना उमेदवारी देण्यात आली.
दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने प्रसाद लाड यांना पाठिंबा दिला आहे. पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
काँग्रेसला सोडून एनडीएमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी रविवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा ही झाली होती. तसेच राणेंच्या भेटीनंतर लगेचच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भाजप उमेदवारावर शिक्कामोर्तब झाले.
प्रसाद लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भाजपा विधिमंडळ पक्ष प्रतोद आ. राज पुरोहित, आ. भाई गिरकर, आ. प्रवीण दरेकर, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी तसेच शिवसेनेमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आ. सुनिल प्रभू, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे सहायक मिलींद नार्वेकर उपस्थित होते.
अदृश्य बाण’ चमत्कार घडवणार : खा. चव्हाण
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत ‘अदृश्य बाण’ चालून चमत्कार घडून येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांचा अर्ज दाखल केल्यानंतर विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. खा. चव्हाण म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी, हमीभाव आदी मुद्यांवर शिवसेना सतत सरकार विरूद्ध नाराजी व्यक्त करते आहे. काल-परवाच त्यांनी सत्ता सोडण्याचाही इशारा दिलेला आहे. एकंदर राजकीय परिस्थिती पाहता या पोटनिवडणुकीत ‘अदृश्य बाण’ चालून विरोधी पक्षांचे उमेदवार दिलीप माने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तर मीच जिंकलो असतो : राणे
माझ्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येणे हाच विजय असल्याचे नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर व्यक्त केले. भाजपकडून मला संधी मिळाली असती तर शिवसेनेची मते फुटली असती. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतरही विधानपरिषदेची पोटनिवडणूक मी जिंकलो असतो असा विश्वास राणेंनी बोलून दाखवला. भाजपचा निर्णय मान्य असल्याचेही राणे म्हणाले. दुसरीकडे, भाजपने विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधूनच नाराजीचे सूर उमटत आहेत.