जगाचा पोशिंदा बळीराजा अडकला विवंचनेत !
जामखेड / ता. प्रतिनिधी
पाऊस लांबणीवर गेल्याने जामखेड तालुक्यातील खरीप पीक हातचे जाईल की काय, या विवंचनेत शेतकरी आहे. मात्र काही शेतकर्यांचे पाऊस पडावा व शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी देवाला साकडे पडलेल्या जेमतेम पावसावर पेरणी करून काळ्या आईची ओटी भरण्यासाठी खरीपाच्या हंगामात सर्वच शेतकरी बांधवाची घाई आणि लगबग सुरू असते. पेरलेले उगवेल धन धान्य येईल, चारा मिळेल आणि मी सुखी व समृद्ध होईल, इडा पिडा टळेल व माझ्या बळीचं राज्य येईल या सार्थ भावनेने शेतकरी प्रत्येक हंगामात आपल काम चोख पार पाडत असतो, मात्र ही त्याची सर्व स्वप्न साकार व्हायची असतील तर, निसर्गाची साथ हवी, अन्यथा शेतकर्यांचे सर्व श्रम मातीमोल झाल्याशिवाय राहत नाही. सर्व शेतकरी पाऊस पडतो की नाही म्हणून चिंतेत आहेत. पाऊस नाही पडला तर शेतकर्यांना दुबारा पेरण्यांची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. काही पीके आता जोमात आहेत, मात्र जर पाऊस नाही पडला तर, पीके कोमात गेल्या शिवाय राहणार नाहीत.
अशीच काहिसी परिस्थिती जामखेड तालुक्यात निर्माण झाली आहे. तालुक्यातील बहुतांश भागात जेमतेम पाऊस पडल्याने, सर्व शेतकर्यांनी फार मोठ्या उत्साहात तूर, मूग, उडीद, हुलगा, मटकी, बाजरी, सोयाबीन, मका आदी धान्याचा पेरा केला होता. पडलेल्या पावसाच्या सरीमुळे सर्व धान्य बर्यापैकी रूजून उगवले आहेत, मात्र पुढील पिकांच्या वाढीसाठी पावसाची अत्यंत गरज आहे. परंतु पावसाने लपंडाव सुरू केला असल्याने, शेतात उगवलेल्या पिकाकडे पाहून शेतकरी चिंतेत झाले असुन, जर पाऊस पडला नाही तर खरीपाचे पीक वाया जातील अशी भिती व्यक्त करत आहेत. तर आषाढी वारीनिमित्त जाणार्या वारकर्यांच्या माध्यमातुन आपलाही संदेश विठ्ठलास देऊन, पाऊस पडून शेतकरी सुखी व समृद्धि व्हावा असे साकडे काही शेतकरी घालताना दिसत आहेत.