विद्यार्थ्यांना शैक्षणिक वापरासाठी मोफत टॅब
प्रवरानगर / प्रतिनिधी
लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मध्ये नवीन प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने प्रथम वर्षात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वापरासाठी मोफत टॅब देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य मनोज परजणे यांनी दिली.
चालू शैक्षणिक वर्षांमध्ये लोणी येथील पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेणार्या एस.सी, व्ही.जे.एन.टी, एस.बी.सी, ओ.बी.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत वसतिगृह व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यासाठी मदत करण्यात येणार असून, महाराष्ट्र राज्यातील कायम अदिवाशी विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांचे शासकिय तंत्रनिकेतनमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चिंत झाले असतील, अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी लोणी येथील पॉलिटेक्निक पहिल्या वर्षांमध्ये प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांकडून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लागू असणार्या फी मधेच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच राहुरी भागातून येणार्या विद्यार्थ्यांसाठी राहुरी, राहुरी फॅक्टरी, गुहा, चिंचोली, कोल्हार मार्गे लोणी तसेच श्रीरामपुरवरून येणार्या विद्यार्थ्यांसाठी श्रीरामपूर, बेलापूर, उक्कलगाव, फात्याबाद, कोल्हार मार्गे लोणी तसेच शिर्डी, राहता, बाभळेश्वर प्रवरानगर मार्गे लोणी आणि आश्वी विभागातील विद्यार्थ्यांसाठी पिंप्रीलौकी, शिबालापूर, आश्वी, दाढ, हासनापूर मार्गे लोणी अशी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
