Breaking News

शहरात वाहतुकीचा वाजला बोजवारा


कोपरगाव शहर प्रतिनिधी :

शहरात रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताहांमध्ये पोलिसांनी बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या, बेशिस्त वाहनधारकांविरोधात दंडात्मक मोहिम राबविली होती. बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध दंड आकारणी केल्याने या प्रकाराला काहीसा आला बसला. मात्र पुन्हा हा बेशिस्तपणाचा प्रकार सुरु झाला आहे. यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. सामान्य जनतेला ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. 

पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारवाईचा वाहनधारकांनी धसका घेतला होता. रस्त्यांवर वाहन पार्किंग करणे बंद झाले होते. परंतु अनेक दिवसांपासून शहरात वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याचे पाहून वाहनधारकांनी पुन्हा बेशिस्तपणे वाहन पार्किंग करणे सुरू केले आहे. त्याचा प्रत्यय आज {दि. २ } आला. शहरात राजस्थान पासिंगचे मोठे अवजड वाहन छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले आणि तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली.

शहरातील अणाभाऊसाठे चौक, आंबेडकर चौक, विघ्नेश्वर चौक, छ. शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, पोलिस स्टेशन या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. प्रत्येक चौकात सिग्नल व्यवस्था व वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.