Breaking News

राज्यात 16 जुलैपासून दूध संकलन बंद आंदोलन- राजू शेटटी


राज्यात येत्या 16 जुलैपासून दूध संकलन बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. जोपर्यंत कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दुधाला ५ रूपये अनुदान थेट शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत नाही तोपर्यंत दूध पुरवठा बंद असणार आहे. या संपूर्ण परिस्थितीला सरकार जबाबदार ठरणार असल्याचेही ते म्हणाले. या संकटाची पूर्वसूचना यापूर्वीच मी केंद्रीय कृषी मंत्री व दूध संघांनाही दिली होती. पण, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. आता दुधाला अनुदान मिळण्यावर आम्ही ठाम आहोत. त्याचा निर्णय 15 जुलैपर्यंत कोणत्याही स्थितीत व्हायला हवा. तसा निर्णय न झाल्यास मुंबईला जाणारे तीन मार्ग शेतकरी संघटना रोखून धरेल. आंदोलन आम्हाला नवीन नसल्याने हे काम अवघड नाही. यापूर्वी हा प्रयोग आम्ही केला आहे. त्यातून सरकार आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करणार असेल तर शेतकर्‍यांसाठी आम्हीही कायदा हातात घ्यायला तयार आहे. दोन-तीन महिन्यांचा हा प्रश्‍न आहे. रोज 1 कोटी लीटर गायीचे दूध संकलित होते. प्रतिलीटर पाच रुपयांनी दिवसाला पाच तर महिन्याचे 150 कोटी होतात. तीन महिन्यांसाठी 450 कोटी लागतात. तेवढी तरतूद करायला सरकारला अडचण नाही, असेही खा. शेट्टी म्हणाले.