तालुक्यात गुन्ह्यांचा आलेख वाढता
राहुरी / ता. प्रतिनिधी
राहुरी शहर व तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुक, चोरटी वाळू वाहतुक, शनि शिंगणापूर रस्त्यावर शनिभक्तांच्या वाहनास अडविणारे लटकू, भुरट्या चोर्या, आठवडे बाजारातील मोबाईल चोर्या, सोनसाखळी चोर, शाळा महाविद्यालये व बसस्थानक परिसरात असणारे टवाळखोर आदींचा बंदोबस्त करण्यास राहुरी पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र असून बोकाळलेली गुन्हेगारी रोखण्यात पोलिस यंत्रणा अपूरी ठरत आहे.
राहुरीत नगर मनमाड राज्य मार्गावर बसस्थानक परिसरातील जिजाऊ चौक, मार्केट यार्ड, खरेदी विक्री संघ, मल्हारवाडी रोड परिसरात अवैध प्रवासी वाहतुक करणार्या खाजगी वाहनांमुळे रस्त्यावर नित्याची वाहतुक कोंडी, तसेच खाजगी प्रवासी वाहतुक होत असल्याने यास पायबंद घालून वाहतुकीस शिस्त लावली जात नसल्याने अवैध प्रवासी वाहतुक बोकाळली आहे, कोंढवढ, शिलेगाव, आरडगाव तसेच मुळा नदीपात्रातून राजरोसपणे होणारी चोरटी वाळू वाहतूक यातून वाढत असलेली गुन्हेगारी यावर अंकुश ठेवण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत आहे, महिनाभरापूर्वी राहुरी पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारलेले प्रभारी पो. नि. यांना येथील परिस्थितीवर वचक ठेवण्यात आज तरी म्हणावे असे यश मिळालेले नाही. शाळा महाविद्यालये आदी ठिकाणी टारगट टोळ्या, रोडरोमियोंचा वाढता त्रास रोखावा अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आलेल्या फिर्यादींचा संपूर्ण लेखाजोखा माहित करुन घेत उलटपक्षी त्यांचेवरच पोलिसी खाक्या दाखवण्याचा प्रकार होत असल्याचे येथे येणार्या अभ्यागतांमधून बोलले जात आहे. सर्वसामान्य नागरिक पोलिस ठाण्यात येण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. भुरट्या चोर्या, आठवडे बाजारातील मोबाईल चोर्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत.