पालकांची मुलांना शाळेत जाण्यासाठी होडीची मागणी
तळेगाव / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील एका पालकाने आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी चक्क होडीची मागणी केली आहे. त्यांचा अर्ज वाचुन ग्रामसेवक क्षणभर अचंबितच झाले. वडगाव पान येथील सावकार वस्ती येथील लक्ष्मण तान्हाजी काशिद यांची अजय व विजय नावाची दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले संत जनार्दन स्वामी विद्यालय कोल्हेवाडी येथील शाळेत शिकत आहे. लक्ष्मण काशिद हे कोल्हेवाडी व वडगाव पान येथील शिवहद्दीत राहतात. मुलांच्या शाळेसाठी कोल्हेवाडी येथील विद्यालय जवळ असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे येथील शाळेत नाव दाखल केले आहे.
सावरकर वस्ती ते शाळेचे अंतर एक किलोमीटरच्या आसपास आहे. मात्र शाळेला जाताना वाटेत पाण्याने भरलेले डबके लागते. या डबक्यांतुन मुलांना दप्तर डोक्यावर ठेवून कधी कधी कमरेएवढ्या पाण्यातून जावे लागते. या डबक्यातील पाण्यात विशारी सर्प यांचे बेडूक खाण्याच्या निमित्ताने नेहमीच वावर असतो. त्यामुळे जर पाण्यात सर्प आढळून आल्यास, मुलांना पाण्यातील सर्प निघून जाईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी उशीर होत असतो. या पाण्यात खेकडे, बेडूक व सर्प यांचे नेहमी दर्शन घडत असते. त्याचप्रमाणे रस्त्याच्या बाजूस ऊस असल्याने ऊसामध्ये बिबट्या सावजाच्या शोधात नेहमीच दडी धरून बसलेला असतो. त्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी पर्यायाने डबक्यातुनच भित भितच जावे लागते. त्यामुळे वरील सर्व त्रासाला कंटाळून लक्ष्मण काशिद यांनी वडगाव पान ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बी. के. पवार यांचेकडे आपल्या दोन्ही मुलांना शाळेत जाण्यासाठी होडीची मागणी केली आहे.