कारखाना रस्त्याची दैना दूर करा : ग्रामस्थांची मागणी
अकोले : प्रतिनिधी
शहरातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला कारखाना परिसरातील रस्ता पूर्णपणे चिखलात गाडला गेला आहे. या परिसरातील तरुण सोशल मिडियावर या रस्त्याचे फोटो पोस्ट करून 'स्वच्छ अकोले सुंदर अकोले’ असा उपहासात्मक टोला लोकप्रतिनिधींना लगावत आहेत. या रस्त्याची दैना संबंधित यंत्रणेने दूर करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
शहरातील कारखाना रोड परिसराच्या हद्दीत पानसरवाडी, कारवाडी, अगस्तीनगर तसेच अनेक रहिवाशी कॉलन्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रतिदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या हजारोवर आहे. याखेरीज अगस्ती कारखानादेखील याच रस्त्यावर आहे. त्यामुळे या कारखान्याचे शेकडो अधिकारी कर्मचारीदेखील याच रस्त्याचा वापर करतात. सध्या कॉलेज, शाळा नियमित सुरू झाल्याने असंख्य विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात. या रस्त्याची कधी नव्हे इतकी मोठी दुर्दशा आता झाली असल्याचे वास्तव चित्र दिसत आहे. या रस्त्यावर सर्वत्र पायाच्या घोट्यापर्यंत गाळ साचलेला आहे. अकोले शहरात सध्या पावसाची रिपरिप सुरू असल्याने हा गाळ आणखीच पातळ बनत चालला आहे. अकोले नगर पंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अगस्ती कारखाना व्यवस्थापनाने या रस्त्याची डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यानिमित्ताने केली जात आहे.
… तर रस्त्यावर उतरू
अगस्ती कारखाना रस्त्याची अकोले नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी आणि लोक प्रतिनिधींनी स्वतः पाहणी करावी. जर या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना हा रस्ता खराब वाटल्यास त्यांनी रस्त्याचे काम करावे. अन्यथा करू नये. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना येत्या काही दिवसांत रस्त्यावर उतरणार आहे.
नितीन नाईकवाडी, शिवसेना शहरप्रमुख, अकोले.