Breaking News

विम्बल्डन टेनिस:जोकोविचचा ग्रँडस्लॅम विजय


लंडन

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत केविन अँडरसनचा पराभव करीत विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. जोकोविचचे हे विम्बल्डनमधील चौथे जेतेपद ठरले. जोकोव्हिचने अँडरसन याला ६-२, ६-२, ७-६ (७-३) असे पराभूत केले. जोकोव्हिचने कारकिर्दीतील १३वे ग्रँडस्लॅम विजेतेपद तर या स्पर्धेचे ४थे विजेतेपद पटकावले.

जोकोव्हिचचे सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. पहिले ३ गेम जोकोव्हिचने जिंकले. त्यानंतर अँडरसनने १ गेम जिंकत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण जोकोव्हिचच्या अनुभवापुढे त्याचा निभाव लागला नाही. पहिला गेम जोकोव्हिचने ६-२ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटची सुरुवातही जोकोव्हिचच्या विजयानेच झाली. तो ४-१ असा आघाडीवर असताना अँडरसनने पुन्हा एकदा पुनरागमन करत दुसरा गेम जिंकला. पण त्यापुढील गेम आपल्या नवे करत जोकोव्हिचने दुसरा सेट खिशात घातला. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये जोकोव्हिचने अँडरसनला टायब्रेकरमध्ये पराभूत केले आणि सामना नावावर केला.